परभणी,दि.14 (जिमाका):- जिल्ह्यासाठी सन 2022-23 च्या नाबार्डच्या संभाव्य वित्त आराखड्याची विमोचन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते शुक्रवार दि.14 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले . सदर बैठकीस नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक पी.एम जंगम , जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुनील हट्टेकर , महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उपमहाप्रबंधक गिरीश बेंद्रे , आरसेटी संचालक पांडुरंग निनावे , वि . आर . कुरुंदकर , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा मध्यवर्ती बँक इत्यादी जिल्ह्यातील महत्त्वाच्या बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते . नाबार्डच्या संभाव्य कर्ज आराखड्यानुसार सन 2022-23 साठी 2444.91 कोटी रुपयांचे पीककर्ज निश्चित करण्यात आले आहे . तसेच शेती मधील मुदत कर्जासाठी 437.56 कोटी रुपयांचा संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे . शेतीसह शेतीपूरक कर्ज तसेच एम एस एम ई , शैक्षणिक कर्ज , गृहकर्ज , अक्षय ऊर्जा इत्यादी प्राथमिक क्षेत्रातील सर्व घटकांकरिता परभणी जिल्ह्यासाठी एकूण 4656.43 कोटी रुपयांचा संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे . या वेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सर्व बँक प्रतिनिधींना दिलेल्या लक्षांकानुसार वेळेत कर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या . -*-*-*-*-