परभणी, दि.8 (जिमाका):- वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक दि. ७ जानेवारी २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे शिवानंद टाकसाळे , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद परभणी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली . सदर बैठकीत जिल्हयातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी , जि . प . यांनी खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. सन २०२१-२२ या वर्षात तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत ९ २ तांडा / वस्ती मधील कामाचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत . सदर कामे मंजूर करताना शासन निर्णयानुसार सदरची गावे आराखडयातीलच असली पाहीजेत याची प्रथम खात्री करावी . बृहत आराखडया व्यतिरिक्त असलेल्या गावातील कामे मंजुर होणार नाहीत . बृहत आराखडया व्यतिरिक्त असलेल्या गावातील कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रस्तावीत करु नयेत . सर्व गटविकास अधिकारी यांनी प्रस्तावीत केलेली कामे ही शासनाच्या निर्देशानुसारच व बृहत आराखडया मधीलच आहेत याची पुनश्च खात्री करावी . तसेच तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार हायमास्क दिवे / सौर उर्जा घेता येणार नाहीत . या कामांचे प्रस्तावीत करण्यात आलेले प्रस्ताव वगळण्यात यावेत . सदर योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार सदर योजने अंतर्गत सिमेंट रोड , नालीबांधकाम , विद्युतीकरण , पिण्याचे पाणी , अंतर्गत रस्ते अशीच कामे प्रस्तावीत करण्यात यावीत. शासन निर्देशानुसार जिल्हयातील गावांची , वस्त्यांची ( तांडयांची व वस्त्यांची ) रस्त्यांची असलेली जातीवाचक नावे बदलुन लोकशाही मुल्यांशी निगडीत महापुरुषांची नांवे दयावयाची आहेत . अशा जातीवाचक नावे असलेल्या गावांची , वस्त्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे . जिल्हयातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये अशा गावामध्ये तात्काळ ग्रामसभा घेऊन जातीवाचक नावे बदलुन नविन लोकशाही मुल्यांशी निगडीत महापुरुषांची नांवे देण्या बाबतचे ठराव मंजुर करुन घेऊन अशा सर्व जातीवाचक नावे असलेल्या गावांची वस्त्यांची व रस्त्यांची नांवे बदलण्याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी. रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ दयावयाचा आहे . २०२०-२१ मध्ये ३००० घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले होते . सदर योजनेअंतर्गत जिल्हयातील अनुसूचित जातीच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ दिला गेला पाहीजे . त्यादृष्टीने सर्व गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवका मार्फत सर्वे करुन जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त करुन घ्यावेत. असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-