परभणी, दि.24 (जिमाका) :- ग्राहकांना वस्तु निवडण्याची संधी कायद्याने निर्माण करुन दिली गेली आहे त्यामुळे ग्राहक आपणाला हवी असलेली प्रत्येक वस्तु अथवा सेवा ही आपापल्या निवडीप्रमाणे घेत असतो. कोणताही सेवा पुरवठादार ग्राहकाला एखादी सेवा अथवा वस्तु घेण्यासाठी बंधनकारक करु शकत नाही. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांनी आपापल्या आवडीने व गुणवत्तेच्या आणि विश्वासार्ह सेवा अथवा वस्तु घेणे ग्राहक संरक्षण कायद्याने संरक्षित झाले आहे. ग्राहकांनी फसवणुक होवू नये याची काळजी घ्यावी. ग्राहकाची फसवणुक झाली असल्यास तक्रार करण्याची मानसिकता ठेवावी जेणेकरुन न्याय मिळेल. तरी सर्व जागरुक ग्राहकांनी कोणतीही सेवा अथवा वस्तु खरेदी करतांना पुरवठादाराकडून पक्की पावती हमखास घ्यावी. असे प्रतिपादन ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सेवानिवृत्त डॉ.अजय भोसरेकर यांनी केले. परभणी येथील जिंतूर रोडवरील कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय व आखिल भारतीय ग्राहक मंचच्यावतीने ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती ए.जी.सातपुते, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे वरिष्ठ सदस्य शेख इकबाल अहेमद, अखिल भारतीय ग्राहक मंचचे विलास मोरे, उपप्राचार्या डॉ.संगिता आवचार, नायब तहसिलदार बाबुराव दळवी, आदीची यावेळी उपस्थिती होती. डॉ.भोसरेकर म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्यात ज्या सेवा मोफत दिल्या जातात त्यासोडून इतर सर्व सेवा या कायद्यात मोडतात. बाजारपेठेत महिला अधिक प्रमाणात खरेदी करताना दिसून येतात त्यामुळे महिलांना या कायद्याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन कायद्यानूसार एखाद्या दुकानदाराने विकेलेला माल जर त्रुटीयुक्त असेल तर तो त्याला बदलून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा नाकारण्याचा अधिकार संपला आहे. आपण संबंधितांची तक्रार दाखल केल्यानंतर केवळ 90 दिवसांत निकाल दिला पाहीजे अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे. यात 5 लाखापर्यंचे दावे मोफत निकाली काढले जातात. कायद्याचा वाढदिवस साजरा होणारा हा एकमेव कायदा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अध्यक्षा श्रीमती ए.जी.सातपुते, वरिष्ठ सदस्य शेख इकबाल, विलास मोरे, उपप्राचार्या डॉ.संगिता आवचार आदींची समयोचित भाषणे झाली. यावेळी विविध शासकीय विभागांच्या योजनाच्या लाभाची स्टॉल लावण्यात आली होती येथे मिळणाऱ्या लाभाबद्दल सविस्तर माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आली. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थीनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. -*-*-*-*