परभणी, दि. 8 (जिमाका) :- परभणी येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून शनिवार दि. 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पक्षकारांनी आपली प्रकरणे सामजस्यांने न्याय तडजोडीने निकाली काढण्यासाठी शुक्रवार दि.10 डिसेंबरपर्यंत संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ.के.शेख यांनी केले आहे. जिल्ह्यात दि.11 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकन्यायालय म्हणजे गाव पंचायतीचेच आधुनिक रुप आहे जेथे कायदा जाणणाऱ्या नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोडीने निकाली काढतात. लोकअदालतीमध्ये न्यायालयात दाखल होण्याआधीची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे म्हणजेच बँक वसुलीची प्रकरणे, लोकन्यायालयात ठेवण्यासाठी अनुमती दिलेली वीज, पाणी बीलासंबंधीची प्रकरणे, फौजदारी गुन्हे, वैवाहीक प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे तसेच फौजदारी स्वरुपाची प्रकरणे, 138 ची प्रकरणे, बँक वसुली, वाहन अपघात खटले, जागेबाबतची प्रकरणे, महसूल विषयक प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, वीज व पाणी बिलाबाबतची प्रकरणे जी न्यायालयात प्रलंबित आहेत यांचाही यात समावेश असणार आहे. जास्तीत जास्त पक्षकारांनी लोक अदालतीत आपली प्रकरणे ठेवावी जेणेकरुन या वर्षानुवर्षे सुरु असलेल्या खटल्याचा त्याच दिवशी होत असल्याने वेळेसोबतच पैशाचीही बचत होईल. दोन्ही बाजुचे पक्षकार न्यायाधीशासमोर चर्चा करुन प्रकरणाचा निपटारा करु शकतील. जे नियमित कोर्टात होवू शकत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे सुरु असलेली प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीनेच अधिकाधिक प्रकरणे निकाली निघायला मदत करण्याच्या हेतूने न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल पक्षकारांना या लोकअदालतीच्या माध्यमातून मदत करु शकेल. विशेष म्हणजे याकरीता कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. जी प्रकरणे तडजोडी योग्य आहेत अशा व्यक्तींनी ‍विधी सेवा प्राधिकरणाकडे दि.10 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत. जास्तीत जास्त पक्षकारांनी प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे लोक न्यायालयात ठेवून तडजोडीअंती निकाली काढावीत. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.शर्मा यांनी केले आहे. -*-*-*-*-