Maharshtra News Nanded News

 ओमिक्रॉन…

 ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना

अनुयायांनी घरी राहूनच अभिवादन करावे 

नांदेड (जिमाका) दि.2 :- गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनहा नवीन विषाणू आढळून आला आहे. सद्यस्थितीत सगळीकडे या संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने सध्या कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मार्गदर्शक सूचनानुसार महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी घरी राहून अभिवादन करावे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आवाहन  केले आहे. 

ओमिक्रॉन विषाणुच्या पार्श्वभूमीवर या संक्रमण रोगाचा प्रभाव पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून 6 डिसेंबर  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी गर्दी न करता करावयाचा आहे.  

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीवर शासन, महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक 4 जून 2021 व सार्वजनिक आरोग्य विभागाचे 11 ऑगस्ट 2021 तसेच 24 सप्टेंबर 2021 च्या आदेशान्वये ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन गृह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी केले आहे.   

महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दु:खाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या संसर्गाचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामूळे चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न जाता घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.  चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जे व्यक्ती अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. 

औष्णिक पटेक्षण (थर्मल स्कनिंग ) च्या तपासणीअंती ज्याचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत. तसेच या परिसरात कोणत्याही सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढण्यास मनाई आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे,तालुके येथेही आयोजित करण्यात येत आहे.

000000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%