परभणी, दि.30 (जिमाका) :-जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना रेशनकार्ड, वयाचा दाखला, मतदान कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी व शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी transgender.dosje.gov.in या शासन संकेतस्थळावर ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे. परंतू बऱ्याच तृतीयपंथी व्यक्तीकडे ओळखपत्राचे पुरावे नसल्यामुळे त्यांना शासन संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याने बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. तरी त्यांना ती सर्व कागदपत्रे एकत्रितपणे उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक आर्थिक विकास संस्था स्वप्नभुमीच्या एमएसएमटीआय परभणी रेल्वे स्टेशन समोरील कार्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरास समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायधीश एफ.के.शेख, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे, नायब तहसिलदार लक्ष्मीकांत खळीकर, स्वप्नभुमीचे धीरज मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तृतीयपंथीयांचे न्यायालयामध्ये काही प्रकरण असेल किंवा आपल्याला काही अडचण आल्यास तसेच वकीलाची आवश्यकता असल्यास निसंकोचपणे संपर्क साधावा. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश एफ.के.शेख यांनी केले. तृतीयपंथीयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत हेल्थ कार्ड, वयाचा दाखला हा आरोग्य विभागाकडून देण्यात येईल. असे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे यांनी सांगितले. तर तृतीयपंथीय व्यक्तींना मतदान ओळखपत्र मिळवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचा नमुना क्र.6 अर्ज भरुन घेण्यात आले असून त्यांना रेशनकार्ड उपलब्ध करुन देण्यात येईल व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमानूसार लाभ देण्यात येईल. असे नायब तहसिलदार लक्ष्मीकांत खळीकर यांनी यावेळी सांगितले. -*-*-*-*-