Maharshtra News Nanded News

मतदार यादी…

मतदार यादी संदर्भात आज 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, तसेच नवीन नोंदणी आदी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचण्यासाठी मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी त्रुटी विरहीत करण्याच्या अनुषंगाने या ग्रामसभेच्या कार्यक्रमास जास्तीतजास्त नागरिक आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्र सहाय्यक (बीएलए) यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला असून 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या 25 ऑक्टोंबर रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनेनुसार मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी तसेच नावनोंदणी आदी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत आहे. या दिवशी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलया प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.

 

दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्यानुसार ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली प्रारुप मतदार  यादी  ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी / तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे. गावातील सर्व नागरिकांनी मतदार यादीमधील नोंदी तपासून घ्याव्यात. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवावयाचे असल्यास त्यांना विहित अर्ज तसेच ग्रामसभेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

 

तसेच या ग्रामसभा कार्यक्रमांतर्गत मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होऊन  बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, PWD  मतदार नाव नोंदणी / चिन्हांकित करणे व ज्यांचे दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण  होत आहे त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी या कामावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी दिली आहे

0000

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: