परभणी, दि. 11 (जिमाका) :- जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि.15 डिसेंबर 2021 पर्यंत हयात प्रमाणपत्रे दाखल करणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनधारकांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेतील यादीतील आपल्या नावासमोर सही करुन हयातीचा दाखला देवू शकतात तसेच जीवनप्रमाण या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीनेही हयातीचा दाखला सादर करु शकतील. एसबीआय बँकेच्या शाखेत ऑनलाईन पध्दतीने हयातीचा दाखला दिल्याशिवाय यादीतील नावासमोर स्वाक्षरी करता येणार नाही असा अनेक निवृत्तीवेतनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तरी ऑनलाईन हयातीचा दाखला देणे सक्तीचे नाही तसेच याबाबत एखादी बँक सक्ती करत असेल किंवा रक्कम आकारत असेल तर संबंधित बँकेचे व्यवस्थापक अथवा जिल्हा कोषागार कार्यालयात तक्रार नोंदवावी. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी यांनी केले आहे. -*-*-*-*-