अर्धापूरात भरदिवसा भर वस्तीत पिस्तूलाचा वार करून साडे तीन लाखाला लुटले..!
एटीएम मध्ये पैसे टाकण्यासाठी आले असता घडली घटना…!
अर्धापूर /शेख जुबेर अर्धापूर शहरातील नांदेड-नागपूर महामार्गावर तामसा चौकातील इंडिया वन या खाजगी एटीएम मध्ये रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला भरदिवसा भरवस्तीत लूटल्याची घटना घडली आहे. छेऱ्याच्या पिस्तुलाचा वार करून साडे तीन लाख रुपये असलेली बॅग लंपास केली आहे. यात ते किरकोळ जखमी झाले आहेत. सदरील घटना दि.८ नोव्हेंबर रोजी अडीच वाजताच्या सुमारास घडली.

अर्धापूर शहरातील तामसा चौकातील नांदेड-नागपूर महामार्गवर वानखेडे कॉम्प्लेक्स मध्ये इंडीया वन या खासगी कंपनीचे एटीएम आहे. दि.८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास या कंपनीचा कर्मचारी मुख्तारोद्दीन मोईनोद्दीन हे एटीएम मध्ये साडे तीन लाख रुपये रोख रक्कम टाकण्यासाठी नांदेडहून आले होते. त्यावेळी अज्ञात दोघेजण काळ्या रंगाच्या प्लसर गाडीवर येऊन अचानकपणे रक्कम एटीएम मध्ये घेऊन जात असताना छेऱ्याच्या पिस्तुलाचा वार करून पैस्याची बॅग लंपास केली. यात मुख्तारोद्दीन हे किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी भेट दिली. सदरील घटनेच्या संदर्भात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.