Maharshtra News Nanded News

 आसना…

 आसना नदीवरील नवीन पुलावरुन आजपासून एकेरी वाहतूक होणार सुरू 

·         जनतेच्या सुरक्षिततेला अधिक प्राधान्य 

नांदेड, दि. 14 (जिमाका) :- नांदेड जवळील आसना नदीवरील नवीन पुलावरुन आजपासून विजयादशमीचे मुहूर्त साधत एकेरी वाहतूक सुरू केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत नुकताच धोरणात्मक निर्णय घेऊन रस्त्यावरील अपघात व वाहतुकीची होणारी कोंडी कमी करण्याच्यादृष्टिने धोरणात्मक निर्णय जाहीर केला होता. 

आसना नदीच्या पुलावरुन होणारी वाहतूक व वाहनांची संख्या आणि अपघाताचे  प्रमाण लक्षात घेऊन आसना नदीवर नवीन पूल उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. गत जानेवारी महिन्याच्या अखेरीस भूमीपूजन झालेल्या या पुलाचे काम अवघ्या 9 महिन्यात युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. जनतेच्या हिताला अधिक प्राधान्य देऊन नवीन उभारण्यात आलेला हा पूल उद्घाटनाचा कोणताही सोपस्कार न करता येत्या विजयादशमीपासून खुला करण्याचा  निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन युध्दपातळीवर गुणवत्तापुर्ण कामातील कटिबद्धतेचा नवा मापदंड निर्माण केला आहे.

 

अवघ्या 250 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची निर्मिती कंत्राटदार टी ॲन्ड टी लि. पुणे यांच्याकडून सुरक्षिततेचे सर्व मापदंड व निकष पूर्ण करून केली आहे. विशेष म्हणजे जुन्या पुलापेक्षा या पुलाची उंची थोडी अधिक घेतल्याने पूर परिस्थितीतही या नवीन पुलावरुन पाणी गेले नाही, हे विशेष. या पुलानजीक राष्ट्रीय महामार्गाची झालेली सुमार अवस्था, सध्या वाहतूक सुरू असलेल्या पुलावरील मार्गाची झालेली दूरअवस्था, अपघाताची  श्रृखंला, रोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले नागरीक, राष्ट्रीय महामार्गावरील संथगतीने चालू असलेल्या प्रस्तावित पुलाबाबतची वस्तुस्थिती लक्षात घेऊन सदरील पूल या विजयादशमीपासून कोणत्याही औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याची माहिती भोकर येथील कार्यकारी अभियंता कोरे यांनी कळविले आहे. पुलाच्या पोचमार्गाचे व इतर काम या महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

000000

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: