Maharshtra News Parbhani News

कोविड लसीकरण न केलेल्या दुकानदारांना दंड करून दुकाने सील करावेत- जिल्हाधिकारी आंचल गोयल

मिशन कवचकुंडल लसीकरण अभियान * –

परभणी, दि. 08 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील नागरी भागातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी दि.14 ऑक्टोबर 2021 पर्यंत मिशन कवचकुंडल अभियानांतर्गत विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बाजारपेठेतील दुकानदारांचा बहुतांश नागरिकांशी संपर्क येत असतो त्यामुळे त्यांचे लसीकरण पुर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी ज्या दुकानदारांनी अद्यापही लसीकरण करून घेतले नाही अशा दुकानदारांच्या दुकानांना सेलू नगरपालिकेने दंड ठोठावून दुकान सील करावेत. असे निर्देश परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेलू येथील नगर परिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, तहसीलदार दिनेश झंपले, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, बचत गटांच्या महिला, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व मौलाना यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी व परभणी जिल्ह्याला कोरोनामुक्त जिल्हा करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल या प्रयत्नांची पराकाष्टा करत असून आज सेलू शहरातील विद्यानगर, मार्केट व आठवडी बाजार परिसर, मौलाना आझाद नगरासह मुस्लिम बहुल भागात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील नागरिकांना कोविड संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी कोविडची लस घेणे किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व पटवून देत त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास 60 लोकांनी तात्काळ लसीकरण करून घेतले. यावेळी त्यांनी लसीकरण केंद्राला भेट देत लसीकरणाची माहिती व नागरिकांचा प्रतिसाद जाणून घेऊन विविध सूचना केल्या. बाजारपेठेतील दुकान मालकांचे लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तपासत असताना एका दुकानदाराने लस न घेतल्याने त्यास तातडीने 5 हजार रुपयाचा दंड स्वतः जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आपल्या सहीने ठोठावला. आपल्या वॉर्डातील नागरिकांचे व प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांसह जबाबदार नागरिकांनी मिशन कवचकुंडल अभियानाला सामाजिक जाणिवेतून सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी केले. -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: