परभणी, दि. 08 (जिमाका) :- केंद्र शासनाने वाहनासंबंधीत परवाना, योग्यता प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी वैधतेस रविवार दि.31 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ दिली असून मुदतीनंतर योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी वाहनांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपॉईंटमेंट असलेल्या वाहनांची तपासणी ही हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकवर करण्यासाठी सोमवार दि.11 ऑक्टोबरपासून परभणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांची दररोज नियमितपणे नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली आहे. दि.11 जुलै 2021 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मौजे असोला येथील पुल पाहुन गेल्याने वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणी बंद असल्याने अभिलेखावरील केवळ अपॉईंटमेंट असलेल्या वाहनांची तपासणी ही हिंगोलीच्या ब्रेक टेस्ट ट्रॅकवर करण्यात येत आहे. राज्यात दि.4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यात आल्या असून स्कुल बसेसद्वारे शालेय विद्यार्थी वाहतुक सुरु केली आहे.योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण प्रलंबित असलेल्या वाहनांचे नियोजन करुन आवश्यतेनूसार सुट्टीच्या दिवशीही योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्याबाबत सुचना जारी करण्यात आल्या आहेत. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-