Maharshtra News Parbhani News

मताधिकार जागृतीसाठी लोकशाही भोंडला स्पर्धा; अधिकाधिक महिलांना सहभागी होण्याचे आवाहन

परभणी, दि. 08 (जिमाका) :- लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन यंदा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही भोंडला’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. नवरात्र हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव ! महाराष्ट्रातील या उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोंडला गीते. आपल्या लोकसंस्कृतीचं अनन्य वैशिष्ट्य असणारा हा भोंडला कुठे हादगा, तर कुठे भुलाबाई म्हणून साजरा केला जातो. वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा भोंडला जणू स्त्रियांना त्यांची सुख दुःख व्यक्त करण्याचे हे पारंपरिक व्यासपीठच ! सासर-माहेर, तिथली प्रेमा-द्वेषाची नाती हे सर्व स्त्रिया या लोकगीतांतून वर्षानुवर्षं सांगत आल्या आहेत. तरी जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी लोकशाही भोंडला स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी केले आहे. देशाच्या लोकशाहीत निम्मी संख्या स्त्रियांची आहे. आणि, स्त्री ही संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ, प्रेरणास्रोत असते. कुटुंबातील स्त्रीपर्यंत एखादी गोष्ट पोहोचली, तर ती फक्त तिच्यापुरती मर्यादित राहत नाही, ती संपूर्ण कुटुंबाला त्याच्यात सहभागी करून घेत असते. स्त्रीची हीच ताकद लक्षात घेऊन ‘लोकशाही भोंडला’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून स्त्रिया स्वतः तर आपल्या मताधिकाराचा, लोकशाही मूल्यांचा विचार करतीलच, पण सोबत त्यांची कुटुंबंही याबाबत सजग होतील. स्पर्धेची सविस्तर नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून संपर्क साधावा. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून एकल (Solo) किंवा समूह दोन्ही प्रकारची गीते पाठवता येतील. लोकशाही, निवडणूक, मताधिकार या विषयांशी संबंधित भोंडला गीत गाऊन त्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवावी. गाण्यासोबत भोंडल्याचा नाच असेल तरी चालेल. समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा. आपली ध्वनिचित्रफीत https://forms.gle/G8TSjHyFN9hzatzH9 या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत. बक्षिसांचे स्वरूप प्रथम क्रमांक ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये तर तृतीय ५ हजार रुपये असे आहे. दि. ७ ते १५ ऑक्टोबर २०२१ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. लोकशाही, निवडणूक, मताधिकार विषयाशी संबंधित साहित्य पाठविणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%