परभणी, दि.05 (जिमाका) :- जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करतेवेळी ई-पॉस मशीनवर अधिप्रमाणिकरण केल्यानंतर निघणारी पावतीची दुकानदाराकडे मागणी करावी. तसेच रास्तभाव दुकानदारांनी लाभार्थ्यांना पावती देण्यास टाळाटाळ केल्यास त्याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालय अथवा तहसिल कार्यालयास संपर्क साधून माहिती द्यावी. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी केले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमित व मोफतचे धान्य माहे नोव्हेंबर 2021 पर्यंत स्वस्त धान्य दुकानातून वितरीत करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी सदरील धान्य घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशीनवर आधार अधिप्रमाणिकरण करुन धान्य घ्यावे. लाभार्थ्यांनी ई-पॉस मशीनवर आधार अधिप्रमाणित केल्यानंतर मशीनमधून संबंधित लाभार्थ्यांस अनुज्ञेय असलेल्या धान्याची पावती प्राप्त होते ती पावती लाभार्थ्यांनी घेणे आवश्यक असून ज्यावरुन संबंधितास अनुज्ञेय असलेले धान्य व त्यासाठी लागणारे पैसे आदीचा तपशिल यावर प्राप्त होतो. जेणेकरुन लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेले धान्य व त्यासाठी द्यावयाचे पैसे याची माहिती होईल. -*-*-*-*-