Maharshtra News Nanded News

 7…

 7 ऑक्टोंबरपासून कंटेनमेंट झोनच्या बाहेरील

धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी

ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदशक सूचना जारी 

नांदेड (जिमाका) दि.4 :- कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने साथरोग कायदा व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थना स्थळे येत्या 7 ऑक्टोंबरपासून अटी व शर्तीच्या अधीन राहून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनच्या आत जर एखादे धार्मिक स्थळ अथवा प्रार्थना स्थळ असेल तर त्यास उघडण्याची परवानगी नसे. यासंदर्भात नांदेडचे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. 

 धार्मिक स्थळासाठी या आहेत अटी

धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोंबर 2021 पासून केवळ कंटेनमेंट झोनच्या बाहेरील उघडण्यास अनुमती राहील. त्‍या-त्‍या धार्मिक स्थळांच्या, सार्वजनिक प्रार्थनास्थळाच्या ट्रस्ट, बोर्ड, प्राधिकरणाने ठरवलेल्या वेळेनुसारच उघडण्याची परवानगी असेल. कोणत्याही व्यक्तीला प्रवेशासाठी फेस मास्क घालणे, सामाजिक अंतर, थर्मल स्कॅनिंग आणि हँड वॉश किंवा सॅनिटायझरची तरतूद अनिवार्य राहिल.  धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळांना व तेथील अधिकारी/कर्मचारी, सेवकांना कोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळणे बंधनकारक आहे. यात स्थानिक प्राधिकरण व त्‍यांचे अधिकारी हे संबंधित धर्मगुरु, पुजारी,भावीक यांचेशी चर्चा करून, स्‍थानिक परिस्थिती विचारात घेऊन, या मार्गदर्शक तत्त्वांमध्‍ये आणखी काही निर्देश जोडू शकतील. याचबरोबर सामाजिक अंतर आणि खबरदारीचे सर्व निकष पाळणे बंधनकारक राहतील. कोविड –19 चा प्रसार रोखण्यासाठी विशिष्ट ठिकाणी करावयाच्या विशिष्ट उपाययोजना व्यतिरिक्त, स्वीकारल्या जाणाऱ्या विविध सामान्य, सावधगिरीच्या उपायांचा समावेश करण्‍यात आला आहे.  

सामान्‍य प्रतिबंधात्मक उपाययोजना

 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, अनेक व्‍याधीने ग्रस्‍त असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  धार्मिक संस्थांनी त्‍यानुसार लोकांना जागृत करण्‍यानुषंगाने योग्‍य ती दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.  कोविड 19 चा धोका कमी करण्यासाठी सामान्य प्रतिबंधात्मक उपायांमध्ये, साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचा समावेश आहे. या उपाययोजना सर्व ठिकाणी (कामगार आणि अभ्यागत) प्रत्येक वेळी पाळणे आवश्यक आहे.  

अभ्‍यंगतांनी सार्वजनिक ठिकाणी किमान 6 फूट अंतर राखणे बंधनकारक राहील. अभ्‍यंगतांनी मुखपट्टी (फेस कव्हर)/मास्क वापरणे अनिवार्य राहील.   अभ्‍यंगतांचे हात अस्‍वच्‍छ नसले तरी, साबणाने वारंवार हात धुणे आवश्‍यक राहील. (कमीत कमी 40-60 सेकंदांसाठी) शक्य असेल तेथे अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर्सचा वापर करणे आवश्‍यक राहील. (कमीतकमी 20 सेकंदांसाठी).   अभ्‍यंगतांनी श्वसनाशी संबंधीत नियम काटेकोरपणे पालन केले पाहिजे. यामध्ये खोकताना आणि शिंकताना टिशु, रुमाल, कोपराने तोंड आणि नाक झाकणे आणि वापरलेल्या टिशुची योग्य विल्हेवाट लावणे, इत्‍यादींचा समावेश आहे. 

 

 सर्वांनी आपल्‍या आरोग्‍याचे स्‍वतः निरीक्षण करणे आवश्‍यक राहील आणि कोणत्याही आजाराची माहिती लवकरात लवकर, राज्य आणि जिल्हा मदत कक्षाकडे नोंदवणे बंधनकारक राहील. सार्वजनिक धार्मिक स्‍थळ परिसरात थुंकण्यास सक्त मनाई राहील, याचे उल्‍लंघन केल्‍यास स्‍थानिक प्रशासनाकडून दंडात्‍मक कार्यवाही केली जाईल.  सर्वांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावा आणि वापर करावा. 

 

धार्मिक स्थळ व प्रार्थना स्थळांनी खालीलप्रमाणे व्‍यवस्‍था सुनिश्चित करणे आवश्‍यक

परिसरात हात स्वच्छ (साबणाने धुणे/सॅनिटायझ) करणे आणि थर्मल स्क्रीनिंग करण्‍याची व्‍यवस्‍था  आवश्‍यक राहील.  केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच परिसरात परवानगी देण्‍यात यावी.   फेस कव्हर / मास्क वापरणा-या व्यक्तींनाच प्रवेश देण्‍यात यावा.    कोविड-19 बद्दल प्रतिबंधात्मक उपायांवर आधारीत पोस्टर्स / प्रदर्शन फलक ठळकपणे प्रदर्शित करावेत.  कोविड –19 साठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जनजागृती करण्‍यासाठी दृक श्राव्‍य  (ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप) साधनांचा सर्व प्रार्थनास्थळांवर नियमितपणे वापर करावा. 

अभ्यागतांची ठरावीक अंतरावर विभागणी करुनच प्रवेश देण्‍यात यावा. स्‍थानिक अधिका-यांसह (जिल्‍हाधिकारी/महानगरपालिका/न.पा./स्‍थानिक प्राधिकारी इ.) ट्रस्‍ट/मंडळाव्‍दारे सदर इमारतीची संरचना व क्षमता लक्षात घेऊन त्‍या प्रमाणे लोकांना गटाने प्रवेश द्यावा.  अभ्‍यंगतांनी पादत्राणे शक्यतो स्वतःच्या वाहनातच उतरवावीत. आवश्यकता असल्यास त्‍या व्यक्ती/कुटुंबासाठी अभ्‍यांगतांच्‍या जबाबदारीवर स्वतंत्र स्लॉटमध्ये पादत्राणे ठेवण्‍याची व्‍यवस्‍था, स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक व्‍यवस्‍थापनांने करावी. 

 पार्किंगच्‍या ठिकाणी आणि परिसराबाहेर गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. सदर ठिकाणी योग्यरित्या सामाजिक अंतर, नियमांचे पालन करण्‍यात यावे.  परिसराच्या बाहेर असलेली दुकाने, स्टॉल, कॅफेटेरिया इत्यादी ठिकाणी प्रत्‍येक वेळी सामाजिक अंतराचे नियम आणि सर्व संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जाईल याची दक्षता घेणे आवश्‍यक राहील. अभ्‍यंगताच्‍या रांगा व्यवस्थापन करण्यासाठी आणि परिसरात सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे अंतर ठेवून विशिष्ट खुणा/चिन्‍ह केल्या जाव्‍यात. 

अभ्यागतांसाठी शक्यतो स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. प्रवेशासाठी रांगेत उभे असताना प्रत्‍येक वेळी किमान 6 फूट शारीरिक अंतर ठेवणे व पुजेच्‍या जागेच्‍या व्‍यवस्‍थापनाची पुर्णतः जबाबदारी धार्मिक स्‍थळाच्‍या व्‍यवस्‍थापनाची राहील. अभ्‍यांगतांनी आवारात प्रवेश करण्यापूर्वी हात आणि पाय, साबण आणि पाण्याने स्‍वच्‍छ धुवावेत. अभ्‍यांगतांना बसण्याची व्यवस्था अशा प्रकारे केली जाईल की पुरेसे सामाजिक अंतर राखले जाईल. एअर-कंडिशन / वेंटिलेशनसाठी, CPWD च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे ज्‍यामध्‍ये असे निर्देश आहेत की, सर्व वातानुकूल उपकरणांचे तापमान सेटिंग 24-30 डिग्री सेल्सिअसच्‍या श्रेणीत असावे, सापेक्ष आर्द्रता 40-70 डिग्री सेल्सिअसच्‍या श्रेणीमध्ये असावी. ताज्‍या/नैसर्गिक हवेचा स्‍त्रोत शक्‍य तितका असावा आणि क्रॉस वेंटिलेशन पुरेसे असावे. 

अभ्‍यांगतांना प्रार्थना स्‍थळावरील मूर्ती/पवित्र पुस्तके इत्यादींना स्पर्श करण्याची परवानगी नाही. धार्मिक स्‍थळांच्‍या ठिकाणी मोठ्या मेळाव्‍याला/जमावास बंदी कायम आहे. संसर्ग पसरण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, शक्य तिथे रेकॉर्ड केलेले भक्ती संगीत/गाणी वाजवली जाऊ शकतात आणि गायन किंवा गायन गटांना परवानगी देऊ नये. अभ्‍यंगतांनी एकमेकांना शुभेच्छा देताना शारीरिक संपर्क टाळावा. अभ्‍यंगतांनी एकत्रित प्रार्थनेसाठी चटई टाळली पाहिजे आणि अभ्‍यंगतांनी स्‍वतःची प्रार्थना चटई किंवा कापडाचा तुकडा आणला पाहिजे जो ते त्यांच्याबरोबर परत घेऊन जाणे क्रमप्राप्‍त आहे.  धार्मिक स्‍थळाच्‍या आत अभ्‍यंगतांसाठी प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्‍यादी कोणतेही भौतिक अर्पण सदृश्‍य कृती करु नये.

 स्‍थानिक, दैनंदिन नियोजनकर्त्‍यांनी परिसरामध्ये स्वच्छते संबंधाने व स्‍वच्‍छता गृहांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन ती स्‍वच्‍छ ठेवणे आवश्‍यक राहील.  धार्मिक स्थळाच्या व्यवस्थापनाने वारंवार साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे.  धार्मिक / प्रार्थना स्‍थळांच्‍या परिसरातील जमीन, फरशी व इतर बाबतीत वारंवार स्‍वच्‍छता धार्मिक स्‍थळ प्रशासनाने करावी.  स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक स्‍थळांच्‍या व्‍यवस्‍थापकाने, अभ्‍यागतांनी आणि कर्मचा-यांनी चेहऱ्यावरील कव्हर / मास्क, सोडलेले हातमोजे यांची योग्‍य विल्‍हेवाट लावण्‍याचे सुनिश्चिती केली पाहिजे. प्रार्थनास्‍थळावरील पुजारी आणि कर्मचा-यांना कोविड-19 सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे आणि कामावर येण्‍यापूर्वी / रुजू होण्‍यापूर्वी, स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक स्‍थळांच्‍या व्‍यवस्‍थापकांनी त्‍यांची साप्‍ताहिक कोविड चाचणी करणे आवश्‍यक आहे.  स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक स्‍थळांच्‍या व्‍यवस्‍थापकानी स्‍वच्‍छतागृह आणि जेवणाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नियमावलीचे पालन होण्‍याच्‍या दृष्‍टीने धार्मिक स्‍थळांचे ठिकाणी प्रवेश दिली जाणारी संस्‍था, उपलब्‍ध जागा आणि सामाजिक अंतर इ. संबंधाने प्रत्‍येक धार्मिक / प्रार्थना स्‍थळाच्‍या व्‍यवस्‍थापनाने संबंधीत जिल्‍हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे हमीपत्र देणे बंधनकारक असेल. 

परिसरात संशयित किंवा पुष्टीकृत प्रकरण असल्यास, स्‍थानिक प्राधिकरण व धार्मिक स्‍थळ व्‍यवस्‍थापनाने करावयाची कार्यवाही.  आजारी व्यक्तीला एका खोलीत किंवा परिसरात ठेवा जेथे ते इतरांपासून अलिप्त राहतील.   जोपर्यंत डॉक्‍टर्स व्‍दारे तपासणी होत नाही, तो पर्यंत अशा व्‍यक्‍तींचा चेहरा मास्‍कव्‍दारे झाकलेला असावा.  ताबडतोब जवळच्या वैद्यकीय सुविधा (हॉस्पिटल/क्लिनिक) ला कळवा किंवा राज्य किंवा जिल्हा मदत कक्षास संपर्क करावा.   नामांकित सार्वजनिक आरोग्य प्राधिकरण (जिल्हा RRT/उपचार करणारे चिकित्सक) द्वारे जोखीमीचे मूल्यांकन केले जाईल आणि प्रकरणाच्या व्यवस्थापना संदर्भात पुढची कार्यवाही सुरू केली जाईल.  जर एखादी व्‍यक्‍ती पॉझिटिव्‍ह आढळल्‍यास त्‍याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरणाची गरज या संदर्भात पुढची कार्यवाही सुरु केली जाईल. तथापि संपूर्ण इमारतीचे/परिसराचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. 

यासंदर्भात जिल्‍हाधिकारी यांनी दिलेल्‍या निर्देशानुसार ज्‍या  धार्मिक स्‍थळ/ प्रार्थना स्‍थळांच्‍या ठिकाणी दररोज 100 पेक्षा जास्‍त भाविक दर्शनासाठी/ प्रार्थनेसाठी येत असतात त्‍या ठिकाणी दररोज (कोविड-19) लसीकरणाचे आयोजन करण्‍यात यावे असे स्पष्ट केले आहे.  यासाठी संबंधीत धार्मिक स्‍थळ/ प्रार्थना स्‍थळ व्‍यवस्‍थापकांनी महानगरपालिका क्षेत्रासाठी महानगरपालिकेशी तर ग्रामीण भागामध्‍ये वैद्यकीय अधिक्षक, जिल्‍हा रुग्‍णालय/उपजिल्‍हा रुग्‍णालय/ग्रामीण रुग्‍णालय, तालूका आरोग्‍य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (प्रा.आ.केंद्र/ उपकेंद्र) यांचेशी संपर्क साधून त्‍याची व्‍यवस्‍था करुन घेण्‍याचे निर्देश दिले आहेत. 

महसूल व वन विभाग महाराष्‍ट्र शासन यांनी त्‍यांचे पुरवणी आदेश दिनांक  17 जून 2021 मध्‍ये कोरोना 19 प्रादुर्भाव व आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पुढीलबाबी स्पष्ट केल्या आहेत. 

 मेळावे : पाचपेक्षा अधिक मानविजमाव एका विशिष्‍ट कारणास्‍तव जमा झाल्‍यास तो मेळावा या व्‍याख्‍यात बसतो. कुठल्‍याही व्‍यापक विचार पुर्वगृह दूषीत न ठरता यामध्‍ये विवाह, खाजगी संमेलन, निवडणूक प्रचार-प्रसार, सोसायटी बैठका, धार्मिक कार्य, मनोरंजनात्‍मक कार्यक्रम, क्रिडास्‍पर्धा, सामाजिक मेळावे इत्‍यादींचा समावेश होतो. यासंबंधाने कुठल्‍याही स्‍पष्‍टीकरण संबंधाने DDMA यांचा निर्णय अंतिम असेल. हि बाब, याशिवाय कुठल्‍याहि नियमावलीखाली एका विशिष्‍ट प्रयोजनार्थ दिल्‍या गेलेल्‍या मेळाव्‍यांसाठी देखील लागू होईल. 

कोविड-19 चा प्रादुर्भाव असे पर्यंत मोकळी पटांगने उपलब्‍ध जरी असली अशा स्थितीतही 100 पेक्षा जास्त लोकांच्या मेळाव्यावर पूर्ण बंदी राहिल. परंतू असे की यात राज्य किंवा स्थानिक सरकारच्या वैधानिक स्वरूपाचे मेळाव्‍यांचा समावेश नसेल.  वैधानिक स्वरूपाचे स्थानिक सरकारचे मेळावे घेण्‍यासाठी – स्‍थानिक प्राधिकरणे जशी, शहरी विकास विभाग आणि ग्रामीण विकास विभागांनी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे, आणि दि.4 जून 2021 चे आदेश पालन करणे आवश्‍यक राहिल. संबंधित स्थानिक प्राधिकरणाने DDMA च्या पूर्वपरवानगीशिवाय इच्छित असलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी  SDMA/UDD/RDD कडून पूर्व परवानगी घेणे क्रमप्राप्‍त आहे. कोणत्याही बांधकाम केलेल्‍या जागेचा वापर हा 50 टक्के पेक्षा जास्त क्षमतेने करता येणार नाही.   कोणत्याही खुल्या जागेचा वापर हा 25% पेक्षा जास्त क्षमतेने करता येणार नाही.  कोणत्याही एका मेळाव्याचा कालावधी हा 3 तासांपेक्षा जास्त नसावा.  जर एखाद्या ठिकाणी एकापेक्षा जास्त मेळाव्यांचे नियोजन असेल, तर दोन मेळाव्‍यांच्‍या आयोजनामध्‍ये पुरेसा अवधी हा मेळाव्‍यास येणा-या आणि बाहेर जाणाऱ्या लोकांमध्ये अडथळा निर्माण होणार नाही, या प्रमाणात असावा तथापि कोणत्याही दोन मेळाव्यांच्‍या आयोजनामध्‍ये वापरात आलेले स्‍थळ निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छ करणे हे सुनिश्चित करण्यासाठी या दोन संमेलनांमध्ये किमान अंतर असणे आवश्यक आहे. 

 कोणत्याही आस्थापना जेथे मेळावे होत असतील तेथील सर्व कर्मचारी हे एकतर पूर्णपणे लसीकरण झालेली असावीत किंवा कोविड-19 साठीच्‍या निर्देशीत चाचणीमध्‍ये कोविड-19 निगेटिव्‍ह अहवाल असणारी असावीत.  जिथे मेळावे होत आहेत त्‍या आस्‍थापना यांनी अस्तित्‍वात असलेल्‍या सर्व SOP चे पालन करणे बंधनकारक असेल.  उक्‍त नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास दंडात्‍मक कार्यवाही प्रस्‍तावित करण्‍यात येईल आणि अशी चुक वारंवार होत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास, कोविड-19 पूर्णपणे संपुष्‍टात येईपर्यंत सदरची आस्थापना पूर्णपणे बंद करण्‍याची कार्यवाही करण्‍यात येईल. 

दिनांक 4 जून 2021 मध्‍ये विनिर्देशीत केलेल्‍या प्रशासनिक पातळीवर कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखणे अनुषंगाने दिलेली स्‍तर 3, स्‍तर 4 व स्‍तर 5 ची प्रमाणके असलेल्‍या भागात मेळाव्‍यावर पूर्ण बंदी असेल. मेळाव्‍यामध्‍ये खान-पान होणार असेल तर मास्क काढण्‍यास परवानगी असेल परंतु रेस्‍ट्रॉरंटसाठी जे मार्गदर्शक तत्‍व/नियम लागू आहेत त्‍यांचे तंतोतंत पालन करणे क्रमप्राप्‍त राहिल. (कोविड-19 साठीच्‍या विनिर्देशीत स्‍तर 3, स्‍तर 4 व स्‍तर 5 प्रादुर्भाव पातळी असलेल्‍या भागात मेळाव्‍यावर संपूर्णतः बंदी असेल. तथापि स्‍तर 2 चा प्रादुर्भाव असलेल्‍या भागात 50% ऐवढ्या क्षमतेपर्यंतच खान-पानास परवानगी असेल व स्‍तर 1 करीता नियमीत परवानगी असेल.).  हॉटेल्‍स, पर्यटन स्‍थळे या बाबतीत कोविड-१९ प्रादूर्भाव स्‍तर संबंधाने दिनांक 17 जून 2021 रोजीच्‍या पुरवणी आदेशामध्‍ये विनिर्देशीत केलेल्‍या सर्व निर्देशीत बाबी त्‍या-त्‍या परिस्थितीत अंमलात येतील. 

या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महानगरपालिका, नगरपालिका/नगर पंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. सदरील आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी/कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी (Incident Commander) उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहिल असेही जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

00000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%