परभणी, दि.1 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या क्षेत्राचे मतदार नोंदणी अधिकारी, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या मतदार यादीतील नावाची खात्री करावी. तसेच मतदार स्थलांतरित झाले असल्यास नवीन रहिवासाच्या ठिकाणी नाव स्थलांतरित करण्यासाठी कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी करावी अथवा वोटर हेल्पलाइन ॲप डाऊनलोड करून समस्येचे निराकरण करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. नवी दिल्ली भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम- 2022 सुरु करण्यात आला आहे. दुबार अथवा समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन पडताळणी करणे, योग्य प्रकारे भाग तयार करणे, आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व व प्रमाणीकरण करण्याचा कालावधी दि. 9 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत राहील. सोमवार दि. 1 नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. दि. 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दिवसात विशेष मोहिमांचा कालावधी राहील. सोमवार दि. 20 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. बुधवार दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल. नागरिकांना मतदार यादी विषयक कोणत्याही समस्या असल्यास जिल्हा निवडणूक विभागाच्या सहाय्यता कक्षाच्या 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन मतदार सेवा पोर्टल http://www.nvsp.in, वोटर पोर्टल voterportal.eci.gov.in या पर्यायांचा वापर करावा असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-