Maharshtra News Nanded News

 धार्मिक…

 धार्मिक स्थळासह राज्याच्या पर्यटन क्षेत्रातही माहूर गड आता ठरेल वैभवाचे केंद्र

– अशोक चव्हाण
नांदेड (जिमाका) दि. २७ :- विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देवून भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासमवेतच त्या-त्या भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर गडही त्या दृष्टीने विकसित करुन या परिसरातील वनसंपदेच्या, पर्यटनाच्या विकासकामांना प्राधान्य देत एकात्मिक विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
माहूर गडाच्या पायथ्याशी असलेल्या मातृतिर्थाजवळील कॉमन फॅसिलिटी सेंटरपासून तीनही गडांना जाण्या-येण्यासाठी रोप वे चे काम आता जलद गतीने पूर्णत्वास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ‘रोप वे’ उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘वॅपकॉस लिमिटेड’ मध्ये नुकताच करार झाला आहे. या निमित्ताने त्यांनी माहिती दिली. 
माहूर गड आता धार्मिक स्थळांसह राज्याच्या पर्यटन क्षेत्रातही वैभवाचे केंद्र ठरेल यासाठी आम्ही कटिबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या प्रमूख शक्तीपिठापैकी एक असलेल्या माहूर गडाचा आता कायापालट होत असून लवकरच सर्व वयोगटातील भाविकांना त्यांच्या आवडीनुसार भक्तीसोबत पर्यटनाचीही जोड देता येईल. नांदेडच्या पूर्व-ईशान्य दिशेला असलेल्या डोंगर रांगाच्या माथ्यावर रेणूका देवी, अनुसया माता आणि दत्त शिखर हे देशातील सर्व भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. याचबरोबर या डोंगर रागांच्या पायथ्यातून पैनगंगा नदी आपला अवखळ प्रवाह घेत पुढे विदर्भात जाते. अनेक वर्षापासून या भागात असलेली जैवविविधता, वनसंपदा, वन्यजीव हे पर्यटनाच्या दृष्टीनेही शक्ती स्थळ राहीले आहे.  
या शक्ती स्थळांचा येथील जैवविविधता सांभाळून सर्व सेवा सुविधायुक्त‍ विकास आता केला जात असून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत असलेल्या विकास कामांच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
माहूर विकासाच्या दृष्टीने आजवर नोंदविल्या गेलेली पर्यटकांची संख्या, वाहनांची वर्दळ, भक्त व पर्यटकांना अत्यावश्यक असलेल्या सेवा सुविधा, पर्यावरणाच्या दृष्टीने लागणाऱ्या वन विभागाच्या मान्यता, येथील भुगर्भ रचनेनुसार कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक असलेली काळजी व तसा आराखडा ही सर्व कामे प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून  वॅपकॉस लिमिटेड ही कंपनी करेल.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शन व अधिपत्याखाली ही विकासकामे होतील. 
00000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%