परभणी दि.23,(जिमाका) : परभणी जिल्ह्यात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये चार क्षेत्रातील अशासकिय सदस्यांची नियुक्ती करण्याच्या सुचना आहेत. तरी जिल्ह्यातील संबंधित इच्छुक व्यक्तींनी आपली वैयक्तिक माहिती (बायोडाटा) दोन प्रतीत प्राणी कल्याण विषयक केलेल्या कामाच्या तपशीलासह व छायाचित्रासह जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, परभणी येथे दि. 22 आक्टोंबर 2021 रोजीपर्यंत पाठवावेत. असे आवाहन परभणीचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.आर.ए. कल्यापुरे यांनी केले आहे. संबंधित जिल्ह्यातील गोशाळा, पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती आणि संबंधित जिल्ह्यातील मानवहितकारक कार्य करणारे, प्राण्यांवर प्रेम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणारे पाच ते सहा कार्यकर्ते अशा व्यक्तींची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. अशासकिय सदस्य नियुक्तीबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या शिफारसी विचारात घेवुन राज्य शासनाकडून नाम निर्देशनाने नियुक्ती करण्यांत येणार आहे. अशासकिय सदस्यांची नियुक्ती तीन वर्ष कालावधीसाठी राहील परंतु कोणत्याही अशासकिय सदस्याला काढून टाकण्याचे अधिकार शासनास राहतील. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-