परभणी दि.20,(जिमाका) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सामान्य नागरिकांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीमेच्या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार’ याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत पार पडला . कायदेविषयक माहिती देणे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कायदेविषयक बाबींचा प्रचार करणे आणि कायदेविषयक विश्वास वाढावा याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा प्रमुख उद्देश असून प्रशासन व सामान्य व्यक्ती मधील दुवा म्हणून काम करते असे सांगून इतर रोग, मानसिक आधार, शारीरिक आधार, कायदेशीर मदत, वयोवृद्ध माणसाचा सांभाळ करणे तसेच इतर संबंधित बाबींची माहिती प्रास्ताविकात परभणीचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ.के.शेख यांनी अध्यक्षीय समारोप करताना आई- वडिल व जेष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती शितल दत्तात्रय सदरे यांनी केले तर आभार सदानंद धामणे यांनी मानले. सदरील कार्यक्रमास जिल्हा सामान्य रुग्णालय, परभणी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. -*-*-*-*-