Maharshtra News Nanded News

 ई-पीक…

 ई-पीक पाहणी माहिती ॲपद्वारे नोंदविण्यासाठी मंगळवारी विशेष मोहिम  

 

· जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दीष्ट 

नांदेड (जिमाका) दि. 19 : पीक पेरणीची माहिती मोबाईल ॲपद्वारे गाव न. नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत 2 लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देश देऊन ही मोहिम यशस्वी करू अशा विश्वास व्यक्त केला आहे. 

महसूल व वन विभागाचा शासन निर्णय 30 जुलै 2021 नुसार ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी, पूर, कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी गुरुवार 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. 

नांदेड जिल्ह्यात मागील एक महिन्यात 1 लाख शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड करुन नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचा पीकपेरा मोबाईल ॲपद्वारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी 21 सप्टेंबर 2021 रोजी मोहिमेवर भर दिला आहे. या मोहिमेची जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. तालुकास्तरावर या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन केले गेले आहे. 

नांदेड जिल्ह्यात एकुण 1 हजार 556 गावे ऑनलाईन असून प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावयाची आहे. त्यानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत असलेल्या दिनांक इतक्या संख्येत म्हणजेच 2 लाख 10 हजार 921 इतक्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तालुका निहाय गावाची संख्या व उद्दिष्ट पुढीलप्रमाणे नेमून दिले आहे. 

अर्धापूर तालुक्यात 64 गावे आहेत. प्रत्येक गावासाठी 10 किंवा उद्दीष्टानुसार कमी अधिक याप्रमाणे स्वयंसेवकांची संख्या निश्चित केली आहे. याप्रमाणे एकुण 640 स्वयंसेवकामार्फत हे उद्दीष्ट पूर्ण केले जाईल.  प्रत्येक स्वंयसेवकाने 20 शेतकऱ्यांची नोंदणी केल्यास पूर्ण होणारे काम (उद्दीष्टानुसार कमी अधिक) 12 हजार 800 याप्रमाणे होईल. याच धर्तीवर उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, नायगाव, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, लोहा, हदगाव, हिमायतनगर या सर्व तालुक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती केली जात आहे. तलाठी, कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्र चालक, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकाची निवड करुन त्यांचे सहाय्य गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन घेतले जाणार आहे. 

नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांना मास्टर ट्रेनर्स मार्फत ई-पीक पाहणी ॲपचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गावपातळीवर तयार करण्यात आलेल्या सर्व टिमबद्दल विश्वास व्यक्त करुन या मोहिमेचे उद्दीष्ट निश्चित पूर्ण करु असे स्पष्ट केले.

00000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%