परभणी, दि.16,(जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जून महिन्यात बँकाकडे पिक कर्जासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. परंतू अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर झालेले नाही. शेतकऱ्यांना प्रस्ताव  सादर करुन साडे तीन महिने उलटून गेले आहेत. तरी सर्व बँकांनी 30 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पिक कर्ज प्रकरणे मंजूर करुन त्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी पिक कर्जाच्या आढावा बैठकीत दिले.

 यावेळी पालकमंत्री म्हणाल की, पुढील वर्षी मे अखेर पर्यंत शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे प्रस्ताव मागवून घेवून त्यांना 15 दिवसाच्या आत पिक कर्ज उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे. तसेच  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड योजनेबाबत माहिती नाही. तरी जिल्ह्यातील बँकांनी किसान क्रेडीट कार्डची व्याप्ती वाढविण्यासाठी तसेच याबाबत जनजागृती होण्यासाठी चित्रफीत तयार करून शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करावी. तसेच बचत गटांनी बँकाकडे सादर केलेल्या कर्जाचे प्रस्ताव मंजूर करुन त्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यास सांगितले. तसेच माजी आमदार विजय भांबळे  आणि परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी मांडलेल्या प्रश्नांचा लवकरात-लवकर निपटारा करावा असेही निर्देशही यावेळी पालकमंत्री श्री. मलिक यांनी दिले.

जिंतूर व सेलू तालूक्यातील शेतकऱ्यांनी 1 जून रोजी बँकाकडे पिक कर्जासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. परंतू अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पिक कर्ज मंजूर झाले नसल्याचे माजी आमदार विजय भांबळे यांनी  प्रश्न मांडला. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी  जिल्ह्यातील बचत गटांना बँका कर्ज मंजूर करत नसल्याचे यावेळी सांगितले .

यावेळी या बैठकीस खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुराणी, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, माजी आमदार विजय भांबळे जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधीक्षक जयंत मीना यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

****