परभणी, (जिमाका) दि. 15 :- कृषी विभागाच्या विविध योजना तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केलेले विविध कृषी विषयक संशोधने व त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबतची माहिती शेतकऱ्यांना पोहचविण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी कार्यशाळेचे आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. डी. कारले, रेशीम विकास अधिकारी जी. आर.कदम आदीची उपस्थिती होती.

यावेळी कार्यशाळेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात झालेले संशोधन व त्यांचे शेतकऱ्यांना असलेले फायदे या विषयावर  संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार संचालक डॉ.देवसरकर, कृषी विद्यावेत्ता डॉ.जी.डी.गडदे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ.भोसले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महिलांसाठी शेतीमधील कमी वेळात अधिक कामाची उपाययोजना या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्राचार्या डॉ.जया बंगाळे यांनी मार्गदर्शन केले तर डेअरी व दुग्ध व्यवसाय विभागाच्या योजनांवर दुग्ध विकास अधिकारी ए.पी.गोटे यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते कृषी विभागाकडून हरभरा लागवड तंत्रज्ञानावर आधारीत तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. या कार्यशाळेस सर्व तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-