Maharshtra News Nanded News

 माजी आमदार…

 माजी आमदार किशनराव राठोड यांना भेटतांना पालकमंत्री अशोक चव्हाण जेंव्हा गहिवरतात !

नांदेड (जिमाका) दि. 9 :- गत एक सप्ताहापासून जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांसह सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना खूप काही सोसावे लागले. यात मुखेड येथील माजी आमदार किशनराव राठोड यांना आपले पुत्र भगवान राठोड व नातु संदिप भगवान राठोड यांना मुकावे लागले दिनांक 7 सप्टेंबर रोजी मुखेड-कौठा रोडवरील नाल्याच्या पुलावरुन वाहत्या पाण्यात ते चारचाकी वाहनासह वाहून गेले होते. त्यांचे मृतदेह 8 सप्टेंबर रोजी हाती लागले.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीने 8 सप्टेंबर रोजी नांदेड येथे धाव घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. 9 सप्टेंबर रोजी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेला नुकसानीचा धावता आढावा घेत माजी आमदार किशनराव राठोड यांच्या भेटीसाठी मुखेड येथील कमळेवाडीकडे धाव घेतली. येथे माजी आमदार किशनराव राठोड यांची त्यांनी भेट घेतली. सांत्वनपर झालेल्या या भेटीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांना आपला गहिवर आवरता आला नाही. स्व. शंकरराव चव्हाण यांच्यापासून किशनराव राठोड परिवाराचा स्नेह हा आजवर कायम राहत आलेला आहे. आपल्या असंख्य आठवणीला घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज किशनराव राठोड यांची भेट घेऊन सांत्वन करुन धीर दिला. या वयात ऐवढे मोठे दु:ख पचविणे सोपे काम नाही. जी स्थिती आली आहे त्याला सहन करण्याची इश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्याची भौगोलिक रचना ही आव्हानात्मक आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांचे प्रमाण व अतिवृष्टी आल्यानंतर असंख्य ठिकाणावरुन वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे अनेकांना अंदाज येत नाही. हा अंदाज न आल्यामुळेच भगवान राठोड व त्यांचे चिरंजीव संदिप राठोड यांनी पुलावरुन वाहत्या पाण्यातून जाण्याचा निर्णय घेतला असावा. पाण्याच्या प्रवाहात हे वाहन वाहत जाऊन झालेली दुर्घटना अतिशय दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी ज्या ठिकाणी अपघात घडला त्या पुलावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

00000


Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%