ऐतिहासिक टेळकी गावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मान्यवरांकडून लोकशाहीच्या मूल्यांचा जागर

गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप 

नांदेड. (जिमाका) दि. 27 :- भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासा इतकाच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास रंजक आहे. मराठवाडा मुक्तीसाठी ज्यांनी योगदान दिले त्या स्वातंत्र्य सैनिकांची महती इथल्या प्रत्येक पिढींला माहित असणे आवश्यक आहे. यासाठी शालेय अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्तीच्या इतिहासाचा समावेश करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दै. प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी केले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोहा तालुक्यातील ऐतिहासिक टेळकी या गावी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो आणि जिल्हा प्रशासनाच्या सहभागातून आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर, लोहा पंचायत समितीच्या सभापती आनंदराव शिंदे पाटील, उपसरपंच संदीप देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, माहिती सहायक अलका पाटील, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते. 

सर्वांना मुकत्ततेने आचार आणि विचारांचे स्वातंत्र्य लोकशाहीने दिले असून या लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण सदैव डोळयासमोर ठेऊन संस्कृती जतन करून संस्कार जपले पाहीजे अशी अपेक्षा जि. प. सदस्या प्रणिता देवरे यांनी व्यक्त केली. 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना लोकशाहीची जी मूल्ये आहेत त्याचा अधिक जागर होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि परस्पर सहिंष्णूता ही केवळ लोकशाहीचीच मूल्य नाहीत तर अनेकांच्या त्यागातून भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला मिळालेली ती विरासत आहे. याच्या जपणुकीसाठी प्रत्येकाने या देशाचा नागरीक म्हणून आपल्या कर्तव्याचेही भान ठेवले तर खऱ्या अर्थाने तो भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सन्मान ठरेल असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले. 

प्रारंभी क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी या महोत्सवाची रूपरेषा विषद करून भारतीय स्वातंत्रय संग्राम आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील घडामोडींचा धावता आढावा घेतला.

पंचायत समीतीचे सभापती शिंदे पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे मोल लक्षात घेऊन गावाच्या सर्वांगीन विकासासाठी प्रशासनासोबत गावातील प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगीतले. यावेळी लक्ष्मण संगेवार यांनी मनोगत व्यक्त केले. टेळकी गावातील हुतात्मा रघुनाथराव हंबर्डे, हुतात्मा भिकाजी राठोड व इतर स्वातंत्र्य सैनिकांना यावेळी अभिवादन करण्यात आले. याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक परिवारातील बाबुराव मोरे, खंडू मदेवाड, पुरभाजी मोरे, काप्रतवार, बालासाहेब हंबर्डे यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या विदयार्थांचा बक्षीसे आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानिमीत्त गावातील विवीध शाळांमध्ये चित्रकला, रांगोळी आणि फिट इंडीया रन चे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आणि शंकरराव मोरे यांनी केले. 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाहीर रमेश गीरी यांनी सांस्कृतीक आणि देशभक्तीपर गितांच्या सादरीकरणाने उपस्थीत ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची मने जिंकली.

00000