Maharshtra News Nanded News

 शहीद…

 शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आम्ही शिंदे परिवाराच्या दु:खात सहभागी – पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका), दि. 22 :- नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या बलिदानाने सर्वांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे वीरमरण हे देशासाठी आहे. अत्यंत मेहनतीने आणि स्वकष्टाने त्यांनी विविध आव्हानांवर मात करुन सहाय्यक समादेशक पदापर्यंत प्रगती साध्य केली. देशाच्या वैभवाचे प्रतीक असणाऱ्या लाल किल्ल्यापासून अनेक ठिकाणी त्यांनी सुरक्षिततेची जबाबदारी चोखपणे बजावली. छत्तीसगडमधील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असल्याचे सांगून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

मुखेड तालुक्यातील बामणी गावाच्या शिवारात शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्यावर आज सकाळी 10 वा. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, सरपंच माधवराव जाधव, जिल्हा सैनिक अधिकारी महेश वडदकर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसिलदार काशिनाथ पाटील आदी उपस्थित होते. 

शिंदे परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शोकभावना शिंदे परिवाराप्रती व्यक्त केल्या असून हृदय हेलावून टाकणारा हा क्षण असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. शासनाच्यावतीने त्यांनी शहीद सुधाकर शिंदे यांना पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. 

जिल्हा प्रशासनातर्फे बामणी शिवारात शहीद शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तातडीने चबुतरा व शेडची उभारणी केली. शहीद सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव कबीर यांने अग्नीडाग दिला. यावेळी उपस्थितांना गहिवरुन आले. त्यांच्या पत्नी सुधा, वडील रमेश, आई, लहान भाऊ व बहिणीसह सर्व परिवार शोकसागरात बुडाला. अग्नीडागापूर्वी शहीद शिंदे यांना जिल्हा पोलीस तसेच लष्कराच्यावतीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहीद सुधाकर शिंदे यांच्या पत्नी सुधा व वडील रमेश यांच्याकडे लष्कराच्यावतीने पार्थिवावरील तिरंगा यथोचित सन्मानाने सुर्पूद करण्यात आला.  

00000


 

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%