Maharshtra News Nanded News

पाणंद…

पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे

 

नांदेड, दि. 31 (जिमाका) :- शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील पाणंद रस्त्याचे माती काम व त्याचे मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पूनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. कंधार तालुक्यातील कारतळा या गावातील पाणंद रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन दळवे पाटील, जिल्हाध्यक्ष भोसीकर, मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, कारतळाचे सरपंच संभाजी कदम पाटील, गटविकास अधिकारी श्री. बळवंत, ग्रामसेवक सुरवसे, कारतळा येथील शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 

ग्रामीण भागाच्या विकासासाठी गावात पायाभूत सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. गावातील पाणंद रस्ते पक्के झाल्यास दळण-वळणाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्यास मदत होईल. याच धर्तीवर कारतळा येथील मारोती मंदिरापासून ते पुढे एक कि.मी अंतराच्या पाणंद रस्त्याचे माती कामाची सुरुवात करण्यात येत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकास कामात कोणतीही अडचण येणार नाही, असे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी स्पष्ट केले.  

जिल्ह्यातील रस्ते विकासासोबतच पाणी पुरवठ्याच्या योजनेतही गाव स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन या योजनेची अंमलबजावणी पहिल्या फेजमध्ये घेऊन ती पूर्ण करावी. योग्य नियोजन व आराखडा तयार करुन शासनाच्या योजना गावा-गावात राबविण्यात याव्यात. त्यासाठी शासन सर्वोतोपरीने प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावात वृक्षारोपण करुन मोठ्या प्रमाणात गावे हरित करण्याचा संकल्प करावा. वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा आर्दश येणाऱ्या पिढीसमोर ठेवावा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

0000Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%