Maharshtra News Nanded News

 डेंग्यू…

 

डेंग्यू मुक्त नांदेड जिल्ह्यासाठी विशेष मोहिम

प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी” 

         – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- कोरोनाच्या प्रादुर्भावासमवेत डेंग्यूचेही रुग्ण इतर काही जिल्ह्यामध्ये आढळून येत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय डासांमुळे उद्भवतो. या आजाराला आपण आपल्या परिसराची ठेवलेली अस्वच्छता यातूनच निमंत्रण देतो. हा आजार केवळ डासांमुळे होत असल्यामुळे यावर प्रभावी उपाय म्हणजे परिसराची स्वच्छता हाच होय. एडिस इजिप्टाय डास होण्याच्या घरातील व आसपासच्या जागा नागरिकांनी सतत स्वच्छ करणे आवश्यक आहे. आरोग्य साक्षरतेसाठी व सुरक्षित आरोग्यासाठी नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्ह्यात प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी ही विशेष मोहिम राबविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण, नियमित लसीकरण कार्यक्रमात पीएलव्ही लसीचा अंतर्भाव, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण या आरोग्य विषयावर असलेल्या विविध समित्यांची बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विद्या झिने आदी अधिकारी उपस्थित होते. 

डेंग्यू तापाचे ही लक्षणे अंगदुखी, ताप, उलट्या, जुलाब, मळमळ असे असल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकांच्या मनामध्ये अधिक दडपण भिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याचे नाही ते संकट आपण स्वत:हून ओढवून घेण्यापेक्षा आपल्या घरातील व परिसरातील पाणी साचणाऱ्या जागा, शोभेच्या कुंड्या, घरातील कुंड्या, पाणी साठवणुकीचे पात्र, हौद स्वच्छ करुन एक दिवस त्या कोरड्या ठेवल्या तर यावर शंभर टक्के आळा बसू शकतो. नागरिकांनी स्वत:हून ही काळजी घेतली तर नांदेड जिल्हा आरोग्य सुरक्षिततेत आपला वेगळा ठसा निर्माण करेल असा विश्वास डॉ. इटनकर यांनी व्यक्त केला. यादृष्टिनेच डेंग्यू मुक्त जिल्हा होण्यासाठी येत्या शनिवारपासून नांदेड जिल्ह्यात  प्रत्येक शनिवार डेंग्यूच्या काळजीसाठी या विशेष मोहिमेत नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ करुन सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

नांदेड जिल्ह्यात मागील 3 वर्षात डेंग्यूची परिस्थिती पुढीलप्रमाणे आहे. सन 2018 मध्ये एकुण 1 हजार 245 लोकांचे रक्त नमुने घेतले यात 378 डेंग्यू रुग्ण आढळले. सन 2019 मध्ये एकुण 1 हजार 527 लोकांचे रक्त नमुने घेतले यात 473 डेंग्यू रुग्ण आढळले. सन 2020 मध्ये एकुण 320 लोकांचे रक्त नमुने घेतले यात 97 डेंग्यू रुग्ण आढळले. एप्रिल 2021 अखेर एकुण 53 लोकांचे रक्त नमुने घेतले यात 19 डेंग्यू रुग्ण आढळले.  

या बैठकीत जिल्ह्यातील एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांनाही विशेष मोहिम हाती घेऊन कोरोना लसीकरण करण्याचे ठरले.  जिल्ह्यात सद्यस्थितीत 6 हजार 481 एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. या रुग्णांच्या लसीकरणासाठीही आरोग्य विभागातर्फे नियोजन करण्याचे निर्देश डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.

*****

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%