Maharshtra News Nanded News

 मतदान…

 

मतदान प्रक्रियेत मतदारांच्या अधिक सहभागासाठी 

स्वीप- 2021 मोहिम प्रभावीपणे राबवू

         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे हे सक्षम नागरिकत्वाचे द्योतक असून प्रत्येकांनी आपला मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मतदानांविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी या उद्देशाने स्वीप जनजागृती मोहिम हाती घेतली असून जिल्हा प्रशासनातर्फे ती प्रभावीपणे राबविली जाणार आहे. कोविड-19 च्या या काळात मतदानाची प्रक्रिया आरोग्याच्यादृष्टिने अधिक सुरक्षित कशी होऊ शकेल याची काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे. यादृष्टिने स्वीप-2021 मोहिमेंतर्गत अधिकाधिक जनाजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप-2021 कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त  तेजस माळवदकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र आणि जनसंवाद विभागाचे संचालक डॉ. दिपक शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

या कार्यक्रमांतर्गत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, दिव्यांग, वंचित व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था व सामाजिक माध्यमाद्वारे स्वीप जनजागृती कार्यक्रम राबविण्यात  येणार आहे. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाविषयी अधिक जनजागृती होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करणे, मतदार साक्षरता क्लब निर्माण करणे, चुनावी पाठशाला या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विविध शैक्षणिक संस्थेत वाद-विवाद स्पर्धा, रंगीत तालिम, परिसंवाद, पथनाट्या आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. मतदानाचा हक्क बजावतांना दिव्यांग, तृतीयपंथी यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


*****

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: