Maharshtra News Parbhani News

कौशल्य विकास प्रशिक्षण गाव-खेड्यापर्यंत पोहचविण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे – राज्यमंत्री शंभुराज देसाई

 *

राज्यमंत्री यांच्याकडून विविध विभागांचा धावता आढावा

            परभणी, दि.18 (जिमाका) :-  राज्यात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून कोविडजन्य परिस्थितीच्या आव्हानात्मक काळात राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अतुलनिय योगदान दिले जात आहे.  जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबध्द असून येणाऱ्या काळात कौशल्य विकासाच्या विविध योजनतेतील 11 सेक्टरमध्ये प्रशिक्षण देत असून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावर भर दिला आहे. पुणे जिल्ह्यातील औंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर आयटीआयची पुर्नउभारणी  करावी व कौशल्य विकास गाव-खेड्यापर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन आदि विभागांची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे रविवार दि.18 जुलै 2021 रोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, पोलिस अधिक्षक जयंत मीना आदीची प्रमुख उपस्थिती होती.

            पुढे बोलतांना राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले की, जिल्ह्यातील विविध विभागांनी कोविडजन्य परिस्थितीचा विचार करता उत्तम काम करुन उद्दीष्ट पूर्ण केले आहे असे सांगून उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षणाचे दोन शिफ्टमध्ये प्रशिक्षण देवून यासाठी राखीव असणारा निधी वेळेत खर्च करावा अशी संबंधितांना सुचना केली. मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे याबाबत तातडीने पंचनामे करुन लवकर प्रस्ताव सादर करावेत. तसेच परभणी जिल्ह्यातील मार्केट कमीट्यांची सविस्तर माहिती जाणून घेवून सरासरी उलाढाल व नाविण्यपूर्ण उपक्रमांची विचारणा करत सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचा स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीनिहाय अहवाल 8 दिवसात तातडीने सादर करावा. अशा कडक सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी त्यांनी कोरोनाची तिसरी लाट येवू नये याबाबत काय उपाययोजन करण्यात आल्या व तिसरी लाट आल्यानंतरचे नियोजन, जम्बो कोविड सेंटरच्या कंत्राटी व नियमित कर्मचाऱ्यांची तसेच   ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व बेड,  पुरेसा निधीबाबत योग्य त्या सुचना केल्या. यावेळी राज्यमंत्र्यांनी नियोजन, जीएसटी, राज्य उत्पान शुल्क, कृषी, कौशल्य विकास व पणन आदि विभागांचा धावता आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमानाची आकडेवारी,कोविड-19 परिस्थितीतील नियोजन व झालेल्या मृत्यूदर, ऑक्सिजन खाटा, लसीकरण व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीस संबंधित विभागाचे संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: