Maharshtra News Parbhani News

विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

 

      परभणी, दि.13 (जिमाका) :-  भारतीय हवामान खाते प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा यांनी 12 जुलै 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार  दि. 16 जुलै 2021  पर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

या गोष्टी करा – विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. नागरिकांनी आपला शेतमाल वेळीच सुरक्षित स्थळी ठेवावा. पशुधन सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे.

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

-*-*-*-*-

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: