Maharshtra News Nanded News

 योजनेसाठी…

 

योजनेसाठी पात्र असलेले कोणतेही कुटूंब वंचित राहता कामा नये –         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यातील कोरोना संक्रमनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची अधिक ओढा ताण होऊ नये यासाठी शासनाने महसूल विभाग, महिला व बालविकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजना तत्परतेने राबविण्याची मोहिम हाती घेतली आहे. यानुसार शासनातर्फे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबांना भेटून माहिती गोळा केली जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1 हजार 20 मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाची पाहणी केली आहे. यातील विविध योजनांच्या अटी व शर्तीनुसार पात्र असलेली एकही व्यक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.  

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळावा यासाठी कोविड-19 टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीस मनपा आयुक्त सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शिवशक्ती पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, मनपा उपायुक्त अजितपाल संधू उपस्थित होते. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसिलदार यांनी या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेऊन आपआपल्या तालुक्यातील माहिती दिली. 

कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तींची अधिक आर्थिक हेळसांड होऊ नये यासाठी शासनाने प्राधान्याने सर्व विभागातील योजना एकत्रीत राबवून जे लाभार्थी ज्या योजनेला पात्र होतील त्या योजना त्यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही योजना अत्यंत महत्वाची असून प्रत्येक तहसिलदारांनी आपल्या तालुक्यातील माहिती युद्ध पातळीवर गोळा करुन ती तात्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले. 

सद्यस्थितीत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 1 हजार 20 व्यक्तींच्या परिवाराला भेट देऊन माहिती गोळा करण्यात आली आहे. यातील 712 व्यक्तींच्या परिवारासाठी विविध शासकिय योजनांचे लाभ मिळावेत याबाबत प्रस्ताव सादर केले जात असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी दिली.

00000


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: