Maharshtra News Nanded News

 हत्तीरोग…

 

हत्तीरोग उच्चाटनासाठी सामुहिक औषधोपचार मोहीम 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  भारतात हिवताप खालोखाल हत्तीरोग ही सार्वजनिक आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. जगातील 110 कोटी लोकसंख्येचा भाग हत्तीरोगग्रस्त आहे. 80 देशातील 12 कोटी लोकांना याची लागण झाली आहे. त्यापैकी 1 / 3 रुग्ण भारतात आढळतात. भारतात हा रोग देशभर पसरलेला आहे. त्यातल्या त्यात केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पं. बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व बिहार राज्यातील काही भागात हत्तीरोग रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर महाराष्ट्रात नांदेड, नागपूर, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतो. नांदेड जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्ट 2020 हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम सर्व्हेनुसार अंडवृद्धीचे 746 व हत्तीपायाचे 2 हजार 553 असे एकत्रित 3 हजार 299 हत्तीरोगाचे बाह्यलक्षणे युक्त रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात 1 ते 7 जुलै 2021 कालावधीत ग्रामीण भागात व शहरी व मनपा निवडक भागात 1 ते 15 जुलै या कालाधीत राबविली जात आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण 36 लाख 65 हजार 210 लोकसंख्या पैकी 31 लाख 47 हजार 378 लोकसंख्या निवडलेली आहे. त्यात एकूण अपेक्षित लाभार्थी 29 लाख 27 हजार 64 आहेत. यात शुन्य ते 2 वर्षाचे बालके, गरोदर माता व गंभीर रुग्णांना वगळण्यात आले आहे. ही लोकसंख्या नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व मनपा नांदेड शहरातील हडको, सिडको वाघाळा व तरोडा खु, व तरोडा बु. परिसराचा समावेश करण्यात आला आहे. 

बुचेरिया बॅक्रोपटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो. जेंव्हा डासाची क्युलेक्स मादी हत्तीरोग झालेल्या (आजारी) व्यक्तीस चावते तेंव्हा ती मानवाच्या शरीरातील जंतू रक्तासोबत शोषून घेते. डासाच्या शरीरात या जंतुची 12 ते 14 दिवसात वाढ होऊन पुन: दुसऱ्या निरोगी व्यक्तीस जेंव्हा हा डास चावतो तेंव्हा हे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात सोडतो. मानवाच्या शरीरात हे जंतू लसीका संस्थेत जातात तेथे त्यांची वाढ होते. नर व मादी वेगळे होतात. नंतर नर व मादी जंतूचे मिलन होऊन असंख्य पिल्ले जन्म घेतात त्यांना आपण मायक्रोफायलेरिया म्हणतो. नर व मादी मानवी शरीरात 5 ते 8 वर्षे राहतात. लसीकावाहिनीत हे जंतू अडकून बसल्याने तेथील भाग फुगीर बनतो व तेथेच संबंधीत व्यक्तीस विकृती येते त्यासच आपण लसीकाचा हत्तीरोग झाला असे म्हणतो. डास चावण्यापासून ते हत्तीरोगाचे लक्षणे दिसण्याचा कालावधी (अधिशयन काळ ) 12 ते 18 महिने आहे. 

हत्तीरोगग्रस्त रुग्णाच्या लसीकागृंथी सुजतात. जांघेत गाठ येते, वेदना होतात, रुग्णास ताप येतो, थंडी सुद्धा वाजते. काही पुरुषामध्ये वृषणदाह होतो. हातपाय व बाह्य जननेंद्रिय सुजतात. रुग्णास अंडवृद्धी होते. या लक्षणामुळे रुग्ण सामाजिक उपेक्षेस पात्र ठरतो. रुग्णाचे लग्न होत नाही. अशा या हत्तीरोगाचे केंद्र शासनाने सन 2021 पर्यंत उच्चाटण करण्याचे ठरविले आहे. सद्यस्थितीत हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी रुग्णांना औषधोपचार व डास नियंत्रण या कार्यप्रणालीनुसार हत्तीरोगाचे नियंत्रण करण्यात येते. 

जागतिक आरोग्य संघटनेने सुचविल्याप्रमाणे हत्तीरोगाच्या दूरीकरणासाठी एक दिवसीय सामुहिक औषधोपचार एम.डी.ए. (मास ड्रग ॲडमिनिट्रेशन) सर्वांना (ज्यांच्या शरीरात मायक्रोफायलेरिया असोत किंवा नसोत, लक्षणे असोत किंवा नसतो) रोगाचा कायम प्रादुर्भाव असणाऱ्या भागात दिला जातो. फक्त 2 वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रीयांना व खुप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देवू नये. 

या एम.डी.ए. ( एक दिवसीय सामुहिक औषधोपचार) मोहिम ही जवळ-जवळ 12 दिवसाच्या हत्तीरोगाच्या समुळ उपचारा इतकीच प्रभावी आहे. हत्तीरोग रुग्ण शोधणे फार कठीण काम आहे. हत्तीरोगाचे संपूर्ण सर्वेक्षण होत नाही. रोगीचे रक्त नमुने घेणे, तपासणे व रुग्णास 12 दिवस औषधोपचार करणे, शिवाय रुग्णांना काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. एकदम 10 ते 15 वर्षाला विकृती दिसून येते. म्हणून एम. डी. ए. या एकदिवसीय डी.ई.सी. अधिक ॲलबेनडॉझॅाल गोळ्याचा उपचार एक दिवसीय सतत पाच वर्षे केल्यास एकाच मात्रा ( डोस ) मुळे रुग्णाच्या शरीरात जर हत्तीरोगाचे जंतू असतील तर ते जंतू जवळ-जवळ 95 टक्के मरतात. यामुळे रोग फैलावत नाही. पर्यायाने हत्तीरोगाच्या प्रसारास आळा बसतो. 

एक दिवसीय उपचार मोहिमेच्या गोळ्याचा डोस वयोगट- 2 वर्षापेक्षा कमी ( डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- निरंक) ( ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ.- निरंक ), 2 ते 5 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 1 गोळी) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ – 1 गोळी), 6 ते 14 वर्षे (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 2 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ – 1 गोळी), 15 वर्षावरील (डी. ई. सी. 100 मि. ग्रॅम गोळ्याची मात्रा- 3 गोळ्या) (ॲलबेनडॉझोल 400 मि.ग्रॅ – 1 गोळी). 

ही मोहिम नांदेड जिल्ह्यात राबविण्यासाठी 1 हजार 919 टिम ( 2 कर्मचाऱ्यांची एक टिम) तयार करण्यात आली आहे. त्यावर 384 पर्यवेक्षक, 20 जिल्हास्तरीय अधिकारी व 20 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक पाहणी करणार आहेत. ही मोहीम राबविण्यासाठी 78 लाख डि. ई. सी. गोळ्या व 31 लाख अलबेंडॉझॉल गोळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत पोहच करण्यात आल्या आहेत. तेंव्हा डी.ई.सी. व ॲलबेनडॉझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आपल्या घरी, अंगणवाडी व शाळामध्ये आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेवक ग्रामीण भागात 1 ते 7 जुलै कालावधीत तर शहरी व मनपा निवडक भागात 1 ते 15 जुलै 2021 दरम्यान येतील तेंव्हा या गोळ्या जेवन करुन (उपाशी पोटी न घेता) घ्याव्यात. शासनाच्या या मोहिमेस नागरिकांनी प्रतिसाद दिल्यास नक्कीच आपण हत्तीरोगापासून मुक्त होऊ, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आकाश देशमुख यांनी केले आहे.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: