डिईसी, अलबेडाझॉल गोळ्याची एक मात्रा घ्यावी

         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

1 ते 15 जुलै दरम्यान हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत डीईसी + अलबेंडाझॉल गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य खात्यातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, अशा स्वयंसेविका व इतर स्वयंसेवक 1 ते 15 जुलै 2021 दरम्यान आपल्या घरी येणार आहेत. नागरिकांनी या गोळ्या जेवन करुन कर्मचाऱ्याच्या समक्ष घेऊन शासनाच्या मोहिमेस प्रतिसाद दयावा व हत्तीरोगापासून मुक्त रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्हा समन्वय समिती (हत्तीरोग) ची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

 

जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना डीईसी व अलबेंडाझॉल गोळ्याची एक मात्रा कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाऊ घालण्याची कार्यवाही करावी. समिती सदस्य जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) व शिक्षणाधिकारी यांना अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना गोळ्या खाऊ घालण्यासाठी आरोग्य खात्यास सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्ह्यातील हत्तीरोग परिस्थितीचा आढावा व हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा आढावा डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी घेतला.

 

हत्तीरोग हा दिर्घ मुदतीचा व व्यक्तीची एकुणच शारिरीक व मानसिक क्षमता कमी करणारा आजार आहे. हा आजार वुचेरेरिया बॅक्रॉप्टाय व ब्रुगीया मलायी या नावाच्या कृमीमुळे होतो. याचा प्रसार क्युलेक्स क्विकिफॅसिएटस् या डासाच्या मादीपासुन होतो. हत्तीरोग झाल्यास रोग्यास अपंगत्व विद्रुपता येते. हातापायावर सुज, जननेंद्रीयावर व इतर अवयवावर कायमची सुज येऊन विद्रुपता येते. त्यामुळे रुग्णास सामाजिक उपेक्षेस तोंड द्यावे लागते, आर्थिक नुकसान होते, मुला-मुलींचे लग्न होत नाहीत त्यामुळे रुग्ण मनसिक दबावाखाली वावरतो. तसेच जन्मभर दु:ख वेदना सहन कराव्या लागतात.

 

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्ट 2020 हत्तीरोग रुग्ण शोध मोहिम अहवालानुसार अंडवृद्धीचे 746 व हत्तीपायाचे 2 हजार 553 असे एकत्रित 3 हजार 299 हत्तीरोगाचे बाह्य लक्षणे युक्त रुग्ण आहेत. आपला जिल्हा हत्तीरोगासाठी जोखीमग्रस्त असल्याने तसेच आपल्या जिल्ह्यात हत्तीरोग जंतुचे संक्रमण चालु असल्याने यावर एकत्र उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ज्यांच्या शरिरात मायक्रोफायलेरीयाचे जंतु असोत किंवा नसोत, हत्तीरोगाचे लक्षणे असोत किंवा नसोत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना डिईसी व अलबेंडाझॉल गोळ्याची एक मात्रा वर्षातुन एकदा खाणे आवश्यक आहे. फक्त दोन वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रियांना व खूप आजारी रुग्णांना हा औषधोपचार देण्यात येत नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

00000