Maharshtra News Nanded News

 या अस्वस्थ…

 

या अस्वस्थ काळात मानसिक व आरोग्य स्थैर्यासाठी, योगाभ्यासच प्रभावी पर्याय – योग पंडित रमेश केंद्रे 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- काळ अस्वस्थ आहे. काळाचा अस्वस्थपणा मानवी वर्तवणुकीवर पडणे यात काही गैर नाही. पण याची तिव्रता जर अधिक वाढली तर याचा थेट परिणाम मानवी अस्वास्थ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कोरोना सारख्या या भयावह काळात म्हणूनच प्रत्येकाने आपल्या मानसिकतेला अधिकाधिक स्थैर्य देऊन योगाकडे वळले पाहिजे, असे अग्रही प्रतिपादन योग पंडित रमेश केंद्रे यांनी केले. जागतिक योग दिवसानिमित्त त्यांनी आपल्या अनुभवासह कोरोनाच्या आघाताला सहन करीत मनस्वास्थ्य व आरोग्याविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत जिल्हा माहिती कार्यालयाशी संवाद साधून काही उपाय सुचविले.  

योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडणारा एक भक्कम आधार आहे. कोणतीही व्यक्ती या दोन आधारावर भक्कमपणा साध्य करु शकते. स्वत:चे संपूर्ण शरीर संतुलीत ठेवून जसे दोन पायावर ताठ उभे राहणे शक्य आहे त्याच धर्तीवर मनाला शुद्ध ठेवल्याशिवाय व्यक्तीमत्व म्हणून, उत्तम आरोग्याचा साधक म्हणून उभे राहता येत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आव्हाने कितीही आली तरी एकवेळ शरीर स्वास्थ्य माणसाला टिकवता येऊ शकेल परंतू मनस्वास्थ्य टिकेल याची शाश्वती नाही. नोकरीमधील ताण-तणाव, कामातील गुणवत्ता साध्य न झाल्यास येणारी नैराश्यता या नैराश्यतेतून होणारी चिडचिड, एकमेकांवर प्रत्यारोप हे सारे मार्ग आयुष्याला उद्धवस्थ करणारे आहेत. यातून बाहेर पडण्याचा महत्वपूर्ण मार्ग म्हणून सारे जग आता योगाकडे पाहत असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. 

माणसाला अपघात आणि अनुवंशीक आजार जर सोडले तर जवळपास बहुतांश असे 87 टक्के विकार हे मनाच्या अस्थ्यैर्यातून निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. ज्याचे मन जितके खंबीर तो व्यक्ती आरोग्याच्यादृष्टिने तितका खंबीर हे आपण निट समजून घेतले पाहिजे. कोरोनाच्या या कालावधीत जे मनाने खंबीर होते ते अधिक लवकर सावरले, बरे झाले याकडे दूर्लक्षुन चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वास्थ्य म्हणजेच ज्यांचे वात, पित्त, कफ हे त्रिदोष समान आहेत. स्वास्थ्य म्हणजेच ज्यांचा अग्नी प्रदिप्त आहे. स्वास्थ्य म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी, शुक्रधातू समान आहेत. मल विसर्जन विनासायास पार पडते आणि इंद्रिय, मन, आत्मा प्रसन्न आहे म्हणजे स्वास्थ्य आहे अशी साधी व्याख्या योग पंडित केंद्रे यांनी सांगितले. 

शरीराला अधिक जर स्वास्थ्य पूर्ण करायचे असेल तर त्याचा उत्तम मार्ग हा योगा आहे. स्थिर सुखम् आसनम् हे पातंजलीचे एक सुत्र आहे. ज्या स्थितीत बसल्यास शरीर, मन स्थिर होते ती आवस्था म्हणजे योग्य आसन असा याचा अर्थ घेता येईल. आसनांची संख्या 84 लाख इतकी असल्याबाबत एक विचारधारा आहे. एवढे सारी आसने प्रत्येकाला होतीलच असे नाही. परंतू स्थिर सुखम् आसनम् श्लोकाप्रमाणे जमेल तेवढी आसने करणे अभिप्रेत आहे. दररोज नित्य नियमाने सकाळी रिकाम्या पोटी 45 मिनिटे योगाभ्यास केल्यास शरीर मानसिक आध्यात्मिक दृष्टिने समृद्ध होईल. योगाभ्यास वयाच्या 12 व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत कोणत्याही महिला-पुरुषाला करता येऊ शकते. यास धर्म, वंश, देश याचे बंधन नाही. व्यक्तीचे मन याने हलके होते. कार्यक्षमता आणि सकारात्मकता वाढीस लागते. दैनंदिन ताण तणाव निघून जातात, असे केंद्रे म्हणाले.

कोरोनाच्या काळात सारे महत्व श्वसनावर केंद्रीत झाले आहे. याचा पहिला घाला हा श्वसनावर होतो. फुफुसांवर होतो. हे लक्षात घेता नित्त्य प्राणायाम करणे किती आवश्यक आहे याचे महत्व प्रत्येकाला आता पटले आहे. म्हणूनच बहुतांश लोक हे योग साधनेकडे वळत आहेत. यात ओमकार आणि ध्यानधारणा महत्वाची आहे. ओम म्हणत असतांना अ+ऊ+म (2+3+5) प्रमाणात म्हटले तर आपल्या शरिरात नॅट्रिक ऑक्साईड अधिक प्रमाणात पाझरतो व विकारापासून मोठा दिलासा मिळतो. नित्य योगा करणे हे म्हणूनच आवश्यक आहे.

प्रत्येक व्यक्तींनी सुरवातीच्या काळात नकारात्मक भाव बाजुला ठेवून जितक्या लवकर सकाळी उठून योगा सुरु करता येईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यातच शरीर स्वास्थ आणि मनस्वास्थ्याचा मार्ग दडलेला असल्याचे प्रतिपादन योग पंडित तथा योग विद्याधाम नांदेड शाखेचे उपाध्यक्ष रमेश केंद्रे यांनी केले.   


      

*****

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: