Maharshtra News Nanded News

 भोसी…

 

भोसी ग्रामपंचायतीच्या शेतातील विलगीकरण उपायाचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतूक

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सरपंच ताराबाई देशमुख व आरोग्य टिमशी साधला संवाद

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या निमित्ताने आता या संकल्पनेलाच लोकाभिमुख चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यातील असंख्य ग्रामपंचायतींनी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातही अभूतपूर्व काम करुन अभिनव संकल्पना राबविल्या. एरवी शहर आणि महानगरात मर्यादित असलेल्या व्हॉटस्ॲपसारख्या सोशल मीडियाचा उपयोग आपल्या खेड्यात कोरोना येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी करुन यातही नवीन मापदंड निर्माण केला, या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचा गौरव केला.

 

कोरोनातून गावाला सुरक्षित ठेवत राज्यातील विविध ग्रामपंचायतींनी आपआपल्या गावात अनेक अभिनव प्रयोग राबविले, अशा अभिनव प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील प्रातिनिधिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पद्मश्री पोपटराव पवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब ज-हाड यांच्यासह राज्य टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील भोसी गावाने आपला वेगळा पायंडा निर्माण केला. या गावाने साध्य केलेल्या या यशाची माहिती प्रत्यक्ष सरपंचाकडून व्हावी या उद्देशाने या व्हिडिओ कॉन्फरन्सला भोसीच्या सरपंच ताराबाई प्रकाशराव देशमुख यांना निमंत्रित केले होते. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व आरोग्य विभागाची टिम सहभागी झाली होती.

 

सुमारे 2 तास चाललेल्या या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध राहण्याचा सल्ला दिला. राज्यातील लॉकडाऊन अजून उठलेले नाही तर ज्या-ज्या गावांमध्ये कोरोनाचे प्रमाण अटोक्यात आले आहे अशा गावांमध्ये विविध स्तरावर वर्गवारी करुन सवलत दिली असल्याचे स्पष्ट केले. राज्यात लसीकरणाचा तुटवटा जरी असला तरी ज्या प्रमाणात लसीची उपलब्धता होत आहे त्यानुसार लसीकरण मोहिम ग्रामीण भागापर्यंत सक्षम चालावी याची खबरदारी आरोग्य विभागातर्फे घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्या-त्या गल्ली निहाय, लोकसंख्या निहाय टिम तयार करुन त्या-त्या टिममधील सदस्यांनी वेळोवेळी जागरुकतेची भूमिका घेतली तर अशा भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. आरोग्याच्या सुविधा ग्रामपातळीपर्यंत उपलब्ध होण्यासाठी विविध सुविधा शासन पुरवित आहे तथापि या सुविधांची अत्यावश्यकता पडू नये याची काळजी ग्रामस्थांनी घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

 

ग्रामविकास मंत्र्यांकडून गावे कोरोनामुक्त करण्याचा विश्वास

कोरोनामुक्त गाव स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गावे कोरोनामुक्त करू असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी 14 व्या आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोरोना प्रतिबंधात्मक सुविधांसाठी ग्रामपंचायतींना मोठ्याप्रमाणात निधी दिल्याची माहिती दिली. कोरोना मुक्त गावाची स्पर्धा ही स्पर्धा न रहाता लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली

 कोरोनामुक्त गावाची संकल्पना लोकमनात रुजवली

गावखेड्याचा आढावा घेऊन कोरानामुक्त गावाची संकल्पना मुख्यमंत्र्यांनी लोकमनात रुजवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, यासाठी राज्यातील गावे खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. माझे कुटुंब- माझी जबाबदारी अभियानातील जबाबदारी ओळखून गावे आपल्या गाव कुटुंबाची काळजी घेत आहेत. यावेळी टास्कफोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक आणि पोपटराव पवार यांनी ही मार्गदर्शन केले.

 गावाच्या बाहेर शेतातील गृहविलगीकरण ठरले प्रभावी

आम्ही गावातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सर्वप्रथम ग्रामपंचायतची बैठक घेऊन कडकडीत जनता कर्फ्यू लागू केल्याची माहिती भोसीच्या सरपंच ताराबाई देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितली. बाहेरील एकाही व्यक्तीला गावामध्ये प्रवेश दिला नाही. जे बाधित झाले त्यांना गावाबाहेर शेतामध्ये गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. जे वयोवृद्ध व इतर आजारांनी त्रस्त होते त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये हलवले. या विविध प्रयत्नातून 119 बाधितांवरुन आम्ही गावातील कोविड-19 बाधितांची संख्या शुन्यावर खाली आणली. यात ग्रामीण आरोग्य विभागाने विविध दक्षता घेऊन तात्काळ तपासणी व तात्काळ उपचार यावर भर दिल्याने गावातील कोरोनाला आटोक्यात आणल्याचे सरपंच देशमुख यांनी सांगितले.

*****


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: