Maharshtra News Nanded News

 गरज भासलीच…

 

गरज भासलीच तर लहान मुलांच्या आरोग्यासाठी

जिल्ह्यातील विविध रुग्णालयात पाचशे खाटांचे नियोजन

  पालकमंत्री अशोक चव्हाण

 

जर तिसरी लाट आलीच तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात कोविड बाधितांचे वाढलेले प्रमाण बऱ्याच अंशी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या लाटेत तरुण व युवावर्ग मोठ्या प्रमाणात बाधित झाला. भविष्यात जर तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवलाच तर जिल्हा प्रशासनातर्फे वयोवृद्धांसह आता प्रामुख्यांने लहान मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करुन नियोजन केले जात आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपणे आवश्यक असून कोरोनाबाबतची काळजी व सुरक्षित वर्तण मुलांकडूनही होणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक काळजीचे कारण जरी नसले तरी भविष्यात वेळेवर धावपळ होण्यापेक्षा आतापासूनच लहान मुलांसाठी कोविड व्यवस्थापन विशेष वार्ड व खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

 

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात लहान मुलांसाठी सद्यस्थितीत विविध रुग्णालयात 500 खाटांचे विशेष नियोजन करुन याबाबत पूर्वतयारी करण्यात आली. या बैठकीस शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, बालरुग्ण विभाग प्रमुख डॉ. सलिम तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सिरसीकर, बालरोग तज्ज्ञ असोसिएशनचे सचिव डॉ. राजेश नुने, डॉ. संदिप पाटील, डॉ. श्रीरामे यांची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्याची एकुण लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 33 लाख 61 हजार एवढी आहे. यात शुन्य ते 6 वयोगटातील लोकसंख्या ही जिल्ह्याच्या एकुण लोकसंख्येच्या 13.67 टक्के एवढी आहे. शुन्य ते 17 या वयोगटातील संख्या विचारात घेता हे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळपास येते. या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी विशेष काळजी व तसे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यादृष्टिने आजच्या बैठकीत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मुलांसाठी उपचारांच्या सेवा-सुविधा बाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासाठी स्वतंत्र बालरोग तज्ज्ञांचा स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण करुन व्हेंटिलेटर व इतर उपकरणांच्या सुसज्जतेसाठी कृति आराखडा तयार केला आहे. पुढील एक महिन्यांमध्ये याचे नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे.

 

मुलांसाठी लागणारी औषधी, त्यांचे वयोगट लक्षात घेता उपचारा समवेत शाररिक व माणसिक तंदुरुस्तीसाठी उपाय योजना, लक्षण विरहित कोविड जर मुलांमध्ये आढळला तर त्यादृष्टिने नियोजन याचाही साकल्याने या बैठकीत विचार करण्यात आला.      

000000


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: