मुंबई: राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा संचारबंदी व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची घोषणा केली. ही संचारबंदी १५ दिवसांसाठी असेल व उद्या (बुधवारी) १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४०० कोटींचे आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे.

राज्यात करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. आधीच्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट अधिक भीषण असल्याचेही स्पष्ट चित्र दिसत आहे. राज्यात गेले काही दिवस दररोज ५० हजारांवर नवीन रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत उपचारांसाठी जंबो सुविधा निर्माण करण्यात आल्या असतानाही त्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ही स्थिती लक्षात घेता करोना संसर्गाची साखळी तोडण्याची नितांत आवश्यकता आहे व त्यासाठीच कडक निर्बंध व संचारबंदीचे पाऊल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उचलले आहे. राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १ मेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. संचारबंदी व कडक निर्बंध जाहीर करतानाच अनेक महत्त्वाच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्या घटकांना त्यात आर्थिक दिलासा देण्यात आला आहे.