
फिरते लोकन्यायालय व शिबीराच्या वाहनाचे उदघाटन
लोकांनी सामोपचाराने आपले तंटे मिटवावीत
– जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर
परभणी, दि.8 :- जिल्ह्यात फिरते लोकन्यायालय व शिबीराचा कार्यक्रम आज सोमवार दि.8 मार्च 2021 पासून परभणी जिल्ह्यात सुरु झाला असून पुढील काही कालावधीत तो विविध ग्रामपंचायतीमध्ये सुरु राहील. याची पुर्वसुचना ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधितांना दिलेली आहे. तरी या तंटे निवारण मोहिमेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून सामोपचाराने आपले तंटे मिटवावीत, असे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले.
परभणी येथील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात दि.8 मार्च 2021 रोजी फिरते लोकन्यायालय व शिबीरांच्या वाहनांचे उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.बांबर्डे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदास पवार, अपर पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ.के. शेख, सरकारी वकील डी.यु.दराडे, सहाय्यक सरकारी वकील अभिलाषा पाचपोर, वकील संघाचे अध्यक्ष ॲड आर.बी. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की, जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील तंटे हे सामोपचाराने मिटविण्याबद्दल एक योजना तयार करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून फिरते लोकन्यायालय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. फिरते लोकन्यायालय गावात जावून गावातील तंटे असणाऱ्या लोकांना बोलावून घेवून सामोपचाराने तंटे निवारणाचा प्रयत्न करणार आहे. सध्या जरी कोरोनाचा काळ असला तरी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेन आणि मास्क या गोष्टीचे अनुपालन करुन हा शासनाचा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुरुवातीस जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी फिरते लोकन्यायालय व शिबीराच्या वाहनाचे उदघाटन केले तर जिल्हा सत्र व मुख्य न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वाहन मार्गस्थ करण्यात आले.
फिरते लोकन्यायालयाचे उदघाटन दि.8 मार्च 2021 रोजी परभणी येथे तर फिरते लोकन्यायालय दि.16 व 17 मार्च रोजी जिंतूर तालुक्यात शेवडी, साखरतळा आणि येलदरी या गावी जाणार आहे. दि.17 व 18 मार्च रोजी सेलू तालुक्यात मोरेगाव, खेर्डा दु.की., वालूर या गावी जाणार आहे. दि. 18 व 19 मार्च रोजी मानवत तालुक्यात हत्तलवाडी, सावली, आंबेगाव या गावी जाणार आहे. दि.19 व 20 मार्च रोजी पाथरी तालुक्यात मुदगल, रेणापूर, वाघाळा या गावी जाणार आहे. दि.22 मार्च रोजी सोनपेठ तालुक्यात खडका, व कान्हेगाव या गावी जाणार आहे. दि.22 व 23 मार्च रोजी गंगाखेड तालुक्यात बोथी, इसाद, राणीसावरगाव या गावी जाणार आहे. दि.24 मार्च रोजी पालम तालुक्यात वरखेड व बनवस या गावी जाणार आहे. दि.24 व 25 मार्च रोजी पुर्णा तालुक्यात गौर व कावलगाव या गावी जाणार आहे. दि.25 व 26 मार्च रोजी परभणी तालुक्यात शेंद्रा, परभणी आणि जिल्हा न्यायालय परिसर येथे जाणार आहे. याप्रमाणे जिल्हा, तालुकास्तरावर फिरते लोकन्यायालय वाहनाचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-*-*-*-*-
