Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी जबाबदारीने त्रीसूत्रीचे पालन करावे – जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर

 

 

·         परभणी  जिल्ह्यात कोव्हिड-19 लसीकरण बहुमाध्यम जनजागृती अभियानास प्रारंभ

 

परभणी, (जिमाका) दि. 26:- केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड –19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी परभणी  जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  करण्यात आली.

या बहुमाध्यम रथाचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून उद्घाटन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश वडदकर , उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नांदेडचे प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी सुमीत दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.

उदघाटन प्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जनतेने आवश्यकतेनुसार घराबाहेर पडावे तसेच  मास्कचा वापर, किमान 6 फुटाचे अंतर तसेच वेळोवेळी हाताची स्वच्छता करणे या त्रीसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे असे सांगून आपली आणि समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहनही यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी  केले.  या बहुमाध्यम चित्ररथामध्ये शाहीर विजय सातोरे आणि संच  यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा आहे. लोकल फॅार व्होकल हे ब्रीद वाक्य घेऊन राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य  कार्य या जनजागृती अभियानातून केले जाणार आहे.  तसेच एलईडी डिस्प्लेच्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत.  तसेच श्राव्य संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.

पुढील दहा दिवस  परभणी जिल्ह्यातील पुर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू, जिंतुर तसेच परभणी  या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरी भागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

 

-*-*-*-*-

 

 

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: