

परभणी, दि. 17 :- सध्याची कोव्हिडजन्य परिस्थिती पाहता जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्या वाढविणे आवश्यक झाले आहे. महापालिकेने शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या तातडीने चाचण्या कराव्यात. दररोज किमान एक हजार आरटीपीसीआर चाचण्या होणे गरजेचे आहे. असे कडक निर्देश जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिले.
कोविड-19 बाबत बी.रघुनाथ सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर म्हणाले की, कोचिंग, मंगल कार्यालय, दुकाने, बस स्थानक, रेल्वे स्थानक यासह गर्दीच्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. मास्क वापरत नसलेल्या लोकांना दंड करण्यासाठी शहरात 10 पथके स्थापन करावेत. मास्क न घालता दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना प्रवेश देणाऱ्या दुकानदारास दंड करावा तो दंड भरण्यास नकार दिल्यास दुकान सील करावी. अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 लोकांची चाचणी तातडीने करावी. जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या सर्व रुग्णांची सर्वप्रथम आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. तसेच इतर जिल्हातून परभणी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येवून त्यांना प्रवेश देण्यात यावा. तसेच मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी प्राधान्याने करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच तालुकानिहाय आरोग्य विभागाचा आढावा घेवून शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा जाणून घेवून विविध निर्देश दिले. या बैठकीस संबंधित अधिकारी, आयएमए व केमिस्ट संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
-*-*-*-*-
