Maharshtra News Parbhani News

पालम तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देऊ – पालकमंत्री नवाब मलिक

 

   

     परभणी, दि.16 :- स्वच्छ पाणी हा मानवी जीवनातील अमूल्य घटक आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची निकड लक्षात घेता पालम शहरात 17 कोटी 28 लक्ष रुपयांची स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. जिल्ह्यासह शेवटच्या टोकावर असणाऱ्या पालम तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून येणाऱ्या काळात नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा परभणी जिल्‍ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.  

          महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पालम शहर पाणीपुरवठा योजनेच्या  भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. तहसील कार्यालया समोरील परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, भरत घनदाट, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, नगर पंचायत प्रशासक सुधीर पाटील, मुख्याधिकारी संतोष लोंमटे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले की, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पालम शहरात 25 लक्ष लिटर क्षमता असलेले प्रशस्त जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार असून हे जलशुद्धीकरण केंद्र पालम शहराच्या जवळपास 27 हजार 92 एवढ्या लोकसंख्येस पाणीपुरवठा करण्यास सक्षम असेल.

या योजनेच्या माध्यमातून शहरातील प्रतिव्यक्ती 70 लिटर पाणी प्रतिदिन यानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत पालम शहरामध्ये 2 लक्ष  लिटर क्षमतेचे तीन जलकुंभ उभारण्यात येणार असून  त्याद्वारे संपूर्ण पालम शहरात 40 किमी लांब असे लघु जल वितरिका यांचे जाळे बनवून शहरातील प्रत्येक घरात शुद्ध प्रक्रियायुक्त पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

            कोविडच्या परिस्थितीमुळे सरकारचे आर्थिक नियोजन बिघडले असले तरी  राज्याने सक्षमपणे परिस्थिती हाताळली आहे. येत्या काळात अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून विविध योजना जिल्ह्यात राबविल्या जाणार आहेत. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच महाराष्ट्रात नागरीकरणाचा वेग वाढत चालला असून ग्रामस्थ तालुक्याच्या ठिकाणी राहण्यास प्राधान्य देत आहेत.

शहराच्या विस्तारीकरणामुळे निश्चितच शहराची लोकसंख्या वाढत आहे.  स्वच्छ पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, स्मशानभूमी, मैदाने आदी सर्व सुविधा निर्माण होणे गरजेचे झाले आहे. तरी आपण पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा संपूर्ण विकास करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पालम नगरपंचायतीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

    -*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: