Maharshtra News Nanded News

पहिल्या…

पहिल्या टप्प्यातील लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर

 

नांदेड, दि. 16:- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून याबाबत लोकांनी अधिक जागरुकता बाळगून तपासणीसाठी विश्वासाने पुढे सरसावणे आवश्यक आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही चिंतेची बाब असून आरोग्य विभागानेही कोरोना तपासणीचा वेग अधिकाधिक कसा वाढेल याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. नांदेड जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, आरोग्य विभागाची यंत्रणा आणि प्रशासनातर्फे केले जाणारे नियोजन याची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात डॉ दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनिल लहाने, अधिष्ठाता सुधीर देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे,  मनपा उपायुक्त अजितपाल संधू, आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. संजय मोरे, डॉ. शितल राठोड, डॉ. सचिन तोटावार, डॉ. गाडेकर,
डॉ. शंकर अन्नपुर यांची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींचा मृत्यूचा दर हा ३.०८ टक्के इतका झाला आहे. सद्य स्थितीत दर दिवशी पाचशे तपासण्या होत आहेत. हा तपासणी दर वाढवून 2 हजार 800 तपासण्या झाल्या पाहिजेत असेही मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनातर्फे वेळोवेळी कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जे निर्देश दिले जात आहेत त्या निर्देशांचे पालन झाले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. म्हैसेकर यांनी व्यक्त करून कोरोना लसीकरण माहिमेला अधिक गती देण्याबाबतही सांगितले.

 

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या फेरीत आरोग्य क्षेत्रात काम करणारे व कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी असलेली लसीकरणाची मोहिम अधिक गतीने वाढविण्याबाबत स्पष्ट सुचनाही त्यांनी दिल्या.

 

जिल्ह्यात होणारे सांस्कृतिक, वैयक्तिक समारंभ येथे अमाप गर्दी जमा होत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव अचानकपणे वाढविण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मार्गदर्शक सुचनाप्रमाणे नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थींना सोशल डिस्टन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करण्याबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती, याबाबत प्राथमिक स्वरूपाची माहिती व छायाचित्र लावण्यात यावीत असे त्यांनी स्पष्ट केले. कोविड-१९ व्यतिरिक्त इतर आजारावर देखील लक्ष देणे गरजेचे आहे.  क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याचे काम हे ६० टक्के झाले आहे. हे काम अत्यल्प आहे, हे काम  वाढविण्यात यावेत अशा सुचना जिल्हा आरोग्य विभागास डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. मोतीबिंदू, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया  आणि  लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावे. जिल्ह्यातील गठीत कोविड-१९ टास्कफोर्सच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून जिल्ह्यातील संभाव्य वाढीव कोविड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना करण्याबाबत सुचना देण्यात दिल्या.

 

0000


  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: