
परभणी, दि. 4 :- पर्यावरणाचे संवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे. पावसामुळे मातीची झीज थांबविण्यासाठी बांबूची लागवड खूप फायदेशीर असून जिल्ह्यातील गोदाकाठच्या व नदी, नाले, ओढ्याच्या दोन्ही बाजूस बांबू लागवड केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येईल. जिल्ह्यात पर्यावरण संतुलनासह मानव जातीच्या कल्याणासाठी बांबू लागवड योजना यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
बांबू लागवडीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजूषा मुथा आदि प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री.पटेल म्हणाले की, गोदावरी व मांजरा खोऱ्यात 11 उपनद्या असून त्यांची लांबी 2250 कि.मी. आहे. या किनाऱ्यावर 4 हजार हेक्टरवर बांबू लागवड करावयाची असून नॅशनल बांबू मिशन अंतर्गत बांबूचे रोप वाटप केले जाणार आहे. ‘नदी झांकी तो जल राखी’ असा हा उपक्रम आहे. बांबूचे झाड कार्बन घेणारे, तापमान कमी करणारे, पाऊस पाडणारे असे बहुउपयोगी आहे. नद्यांच्या काठाचे गाव शोधून त्या गावांची बांबू लागवडीकरीता निवड अधिक सोयीची असून बांबू लागवड योजना मराठवाड्यात यशस्वी केली तर ही योजना संपुर्ण देशात पोहोचवू असे त्यांनी यावेळी सांगितले.
बांबू हा दररोज जवळपास एक फुटपर्यंत वाढतो. पृथ्वीवरील कार्बनचे प्रमाण कमी करावयाचे असेल तर 30 टक्केपेक्षा अधिक कार्बन खाण्याची क्षमता बांबूत आहे. माणसाला एका वर्षाला 280 किलो ऑक्सीजन लागतो तर बांबूचे झाड 320 किलो ऑक्सीजन वर्षाला निर्माण करते. इथेनॉल व सीएनजी तयार करण्यासाठीही बांबूची मदत होत असते.
सुरुवातीला जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी प्रास्ताविक केले. बांबू लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड करणे सोईचे होईल तसेच बांबूची रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जातील असे सांगून जिल्ह्यातील पाथरी, मानवत, गंगाखेड व सोनपेठ तालुका हा गोदावरीच्या काठावर तर इतर काही गावे नद्याच्या काठावर असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस शेतकरी व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
