Nanded Marathi News

नांदेड:अशोक चव्हाण सेवासेतू’चे २६ जानेवारीला उद्घाटन

नांदेड, दि. २५ जानेवारी :राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी शासकीय कामकाजाबाबतच्या नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी अभिनव संकल्पना समोर आणली आहे. त्यांनी ‘अशोक चव्हाण सेवासेतू’ हे कॉलसेंटर उभारले असून, प्रजासत्ताक दिनी त्याचा शुभारंभ होणार आहे.

नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी एखाद्या लोकप्रतिनिधीने तंत्रज्ञानाचा वापर करून वैयक्तिक पातळीवर कॉलसेंटरची यंत्रणा उभारण्याचा हा कदाचित पहिलाच उपक्रम आहे. ना. चव्हाण यांनी सोमवारी दुपारी डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांच्या ऑनलाईन प्रमुख उपस्थितीत २६ जानेवारीला दुपारी ४ वाजता ‘अशोक चव्हाण सेवासेतू’चे उद्घाटन होणार आहे.

या अभिनव उपक्रमाची मूळ संकल्पना आपली कन्या श्रीजया यांनी मांडल्याचे ना. चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई व नांदेडच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयात रोज मोठ्या संख्येने लोक आपली निवेदने घेऊन येतात. त्यातील अनेक जण दूरदुरून वेळ आणि पैसा खर्च करून आलेले असतात. अनेकदा त्यांच्या समस्या साधारण स्वरूपाच्या व एका दूरध्वनीद्वारे सुटण्यासारख्या असतात. अशा परिस्थितीत नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा, तसेच शासनाशी संबंधित त्यांची कामे लवकर व्हावीत, या हेतूने हे कॉलसेंटर सुरू करण्यात येत आहे.

‘अशोक चव्हाण सेवासेतू’चा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२२३००३ हा असून, सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत नागरिकांना या क्रमांकावर संपर्क साधून शासकीय कामकाजाबाबत आपली अडचण थेट ना. अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचवता येणे शक्य होणार आहे. प्रायोगिक स्तरावर तूर्तास ही सुविधा फक्त भोकर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी सुरू होत असून, भविष्यात हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी राबवण्याचा आपला मानस असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या कॉलसेंटरसाठी विशेष सॉफ्टवेअर बनवून घेण्यात आले आहे. नागरिकांच्या अडी-अडचणी नोंदवून घेण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी १५ जणांची चमू नियु्क्त करण्यात आली आहे. ‘अशोक चव्हाण सेवासेतू’च्या कामकाजाचा दररोजचा अहवाल आपल्याकडे येणार आहे व मी स्वतः या यंत्रणेवर लक्ष देणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

नांदेड जिल्ह्याने नेहमीच मला भक्कम साथ दिली, माझ्यावर प्रेम केले. मी सुद्धा विकासात्मक कामांबाबत जे-जे करता येईल, ते सर्व करीत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही नवीन प्रकल्प आणले जात आहेत. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या गतीमानतेने सुटाव्यात, हाच माझा प्रयत्न राहिला असून, हे कॉलसेंटर त्याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे ना. अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेला आ. अमर राजूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आमदार हनुमंतराव बेटमोगरेकर, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजिब आदी उपस्थित होते.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: