Nanded Marathi News

थकबाकीदार वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होणार

राज्यात 63 हजार 740 कोटी तर नांदेड परिमंडळात 5 हजार 266 कोटी रूपयांची थकबाकी

नांदेड, दि.15 सप्टेंबर,2020 : ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. मात्र वीजग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा विहीत वेळेत होत नाही. त्यामुळे प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी चालू देयके व थकबाकी वसूली होणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे आता थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश सर्व क्षेत्रिय कार्यालयास महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. तेंव्हा थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अन्यथा नाईलाजास्त्व वीज खंडीत करण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

 

डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही. डिसेंबर अखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औदयोगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.

 

मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खाजगी  वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रीतसर परवानगी घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला. मात्र राज्याचे उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अशक्य झाले आहे.

नांदेड परिमंडळात डिसेंबर 2020 अखेर घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्ब्ल 535 कोटी 47 लाख रूपये थकले आहेत. त्याचबरोबर कृषीपंप वीजग्राहकांकडे 4 हजार 107 कोटी 56 लाख रूपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे 106 कोटी 29 लाख तर पथदिवे वीजग्राहकांकडे 512 कोटी 39 लाख रूपये अशाप्रकारे एकूण 5 हजार 266 कोटी 26 लाख रूपये थकीत आहेत. नांदेड परिमंडळांतर्गत येणाऱ्या परभणी जिल्हयातील सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांकडे 1 हजार 838 कोटी 60 लाख रूपये तर हिंगोली जिल्हयातील सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांकडे 1 हजार 259 कोटी 18 लाख रूपये त्याचबरोबर नांदेड जिल्हयातील सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांकडे 2 हजार 168 कोटी 48 लाख रूपये थकीत आहेत.

वीजदेयक भरण्यास काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी वीजबील भरण्याचे प्रमाण समाधान कारक नाही. त्यामुळेच सांघिक कार्यालयाच्या निर्देशानुसार विनंती करूनही चालू देयक व थकबाकी न भरणाऱ्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला जाणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबील भरण्याच्या विविध पर्यायांचा वापर करत वीजबिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: