

परभणी, दि.19 :- परभणी जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तु, स्थळे, मुर्ती, बारव यांचे इतिहासकालीन महत्व आणि वैशिष्टे अधोरेखीत करण्यासाठी उपयुक्त ठरु शकणारे पुरातन ग्रंथ, पोथी, हस्तलिखीते, छायाचित्रे, वस्तु किंवा अन्य सामुग्री जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध असल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी. तसेच जिल्हा प्रशासनाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील चालुक्यकालीन शिल्प, भव्य मंदिरे, नानाविध शिल्पकलाकृती, मनमोहक पुष्करणी, शिलालेख विपूलतेने उपलब्ध आहेत. अभ्यासक, इतिहासप्रेमी, जाणकार आणि संशोधकांसाठी हा जिल्हा एक समृध्द भांडार आहे. परभणी जिल्ह्याची ही नवी ओळख सर्व जगास होणे आवश्यक आहे जिल्ह्यातील वास्तु शिल्पकलेच्या शास्त्रीय आणि ऐतिहासिक माहितीचे दस्तऐवजीकरण करण्याच्या हेतूने परभणी जिल्ह्यातील सर्व पुरातन स्थापत्य केलेच्या अविष्कारांची एक समग्र माहिती पुस्तिका ग्रंथ स्वरुपात निर्माण करण्याचा प्रकल्प जिल्हा प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. आपल्याकडील माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर यांच्या राष्ट्रीय सुचना केंद्रात देण्यात यावी. आपण दिलेले ग्रंथ किंवा अन्य दस्तऐवज डिजीटल फॉर्ममध्ये संग्रहीत करुन मुळ प्रत संबंधितास तात्काळ परत करण्यात येणार आहे. असेही त्यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
