
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
बर्ड फ्लूने घाबरुन न जाता सतर्क
राहून प्रशासनास सहकार्य करावे
-जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.लोणे
परभणी, दि.11 :- दि.12 जानेवारी 2021 पर्यंत परभणी तालुक्यातील मौजे मुरुंबा येथील 843 कुक्कुट पक्षांचे बर्ड फ्लूमूळे मृत्यू झाले आहेत. तसेच सेलू तालुक्यातील कुपटा येथे 7 आणि पेडगाव येथील एका कुक्कुट पक्षाचा मृत्यू झाला आहे. कुपटा व पेडगाव येथील रोगनमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.जे.गायकवाड मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाने रोग प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी संपुर्ण तयारी केली असून जनतेने घाबरुन न जाता सतर्क राहुन प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. लोणे यांनी केले आहे.
सध्या देशात केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये व कावळ्यामध्ये बर्ड फ्लू रोगाचे निदान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनामार्फत सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. बर्ड फ्लूमुळे मुरुंबा गावातील 843 कुक्कुट पक्षांचाच मृत्यू झाला असून जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुरुंबा येथील बाधित क्षेत्रातील एक कि.मी. परिसरात कुक्कुट पक्षांना दयामरण देवून शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी आठ शिघ्र कृतीदलाची स्थापना करण्यात आलेली आहे. बाधित क्षेत्रातील पक्षांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी दुसऱ्या प्रक्षेत्रावर जावू नये तसेच प्रक्षेत्रावर वावरतांना मास्क, सॅनिटायझर, गमबुट, हँडग्लोज व चष्मा वापरुन वैयक्तिक सुरक्षेचे पालन करावे. तरी जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत पक्षी, कावळे, कुक्कुट वर्गीय पक्ष्यांमध्ये असाधारण मृत्यू झाल्याचे आढळुन आल्यास 02452 220388 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधावा. असेही आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
-*-*-*-*-
