Maharshtra News Nanded News

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्र विभागाचा गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल गौरव

 

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या

प्रसुतीशास्त्र विभागाचा गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल गौरव

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांना प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णास सन्मानजनक रुग्णसेवा देणे व त्यांचे संपूर्ण समाधान करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून लक्ष कार्यक्रमभारत सरकारच्यावतीने सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने प्रभावी अंमलबजावणी करुन राष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन करीत नांदेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आनंद व्यक्त करुन शासनाच्या आरोग्य विभागाने वेळोवेळी येथील विकास कामांना मदत करुन सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे रुग्णांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करुन देता येत असल्याचे सांगितले.

भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने 11 डिसेंबर, 2017 पासून लक्ष कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी आपल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रिरोग व प्रसुतीशास्त्र विभागाने महिलांच्या मनात बालमृत्यू रोखण्यासाठी योग्य उपचारासह विश्वास निर्माण केला. याच्या अंमलबजावणीसाठी जे गुणांकन ठेवण्यात आले होते त्यात 96 टक्के गुण मिळवून वैद्यकीय सेवेतील गुणवत्ता सिध्द करुन दाखविली.

आपल्या आरोग्य विभागाच्या धोरणानुसार प्रत्येक गरोदर महिलेला प्रसुतीसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासकीय रुग्णालयांना सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किंवा जिल्हा रुग्णालयात प्रसुतीचे प्रमाण 38.7 टक्क्यावरुन 78.9 टक्के एवढे वाढले आहे. लक्ष कार्यक्रमाअंतर्गत सर्व शासकीय महाविद्यालयामधील व इतर संस्थेमधील प्रसुतीगृहातील व इमरजन्सी ऑपरेशन थिएटरमधील सुविधा सुसज्ज व अद्ययावत करणे, हाय डिपेन्डन्सी युनिट, गंभीर रुग्णांसाठी ऑबस्टेस्ट्रीक आयसीयू तसेच नवजात बालकांसाठीच्या सुविधा अद्ययावत करणे याकडे लक्ष देण्यात आले.

            सद्यस्थितीत 1 लाख माता प्रसुतीमध्ये भारतातील माता मृत्यू दर हा सन 2001 ते 2003 या कालावधीत 301 होता. 2011 मध्ये हा दर 167,  2016 मध्ये हा दर 130 होता. 2020 मध्ये हा दर अवघ्या 70 वर रहावा असे उद्दिष्ट  देण्यात आले होते. या उद्दिष्टाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रासह, केरळ आणि तामिळनाडूने यशस्वी जबाबदारी पार पाडून दाखविली आहे. आंध्रप्रदेश व तेलंगना यांचे उद्दिष्ट पुर्णत्वाकडे आहे.

 हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनानुसार भारतास दर 1 हजार रुग्णांसाठी एक  डॉक्टर 20.6 टक्के हेल्थ केअर वर्करर्स आवश्यक आहेत. ते प्रमाण अनुक्रमे 10 हजार रुग्णांमागे एक डॉक्टर व तर 22.8 टक्के हेल्थ केअर वर्करर्स असे आहे. यानुसार 6 लाख डॉक्टर्स व 20 लाख नर्सिंगची कमतरता आहे. ही तफावत लक्षात घेवून उपलब्ध असलेल्या डॉक्टरांचे व निर्सिंगचे योग्य ते प्रशिक्षण करुन हा कार्यक्रम यशस्वी राबविणे आव्हानात्मक होते. अशा स्थितीत आपल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हे यश संपादन केले.

येथील स्त्रीरोग व प्रसुतीगृहातील सोयीसुविधांची तपासणी गुणांकन करणाऱ्या पथकाने 96 टक्के एवढे गुण देवून आपल्या येथील प्रसुतीसंबंधित रुग्णसेसेवा ही अत्यंत अद्ययावत व दर्जेदार असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.

            या संपूर्ण यशामागे कर्तव्यदक्ष संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, तत्कालीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा आहे. तसेच स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शामराव वाकोडे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत डॉ. फसिहा तसनीम, डॉ. शिरीष दुलेवाड, डॉ. जयदिप सोळंके , डॉ. स्वाती कापसीकर, डॉ. मेघा झरीकर, सर्व निवासी डॉक्टर्स प्रसुतीगृहातील कार्यरत सर्व नर्सिंग स्टाफ व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे अविरत कार्य आहे. या यशासाठी महाविद्यालयातील विभागप्रमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय.एच. चव्हाण, मेट्रन सौ. आपटे यांनी विभाग प्रमुख डॉ. वाकोडे व त्यंच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

0000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: