Maharshtra Marathi News Parbhani Hindi News

कोव्हीड लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

परभणी, दि. 22 : मागील मार्चपासून अवघे जग कोव्हीडशी समाना करत आहे. यात आपला परभणी जिल्हाही सुटला नाही. याचा प्राधुरभाव कमी करण्यासाठी संशोधकांनी अथक परिश्रमानंतर कोव्हीडची लस संशोधित केली आहे. परभणी सारख्या ग्रामीण बहुल जिल्हयात कोव्हीडचे लसीकरण सुत्रबध्द पध्दतीने व्हावेत यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन झाले असून ही मोहिम जिल्हा आरोग्य विभाग, महसुल विभाग, जिल्हा परिषद व इतर विभागाच्या समन्वयातून प्रभावीपणे राबवू असा विश्वास जिल्हाधिकारी दिपक मुंगळीकर यांनी व्यक्त केला.

नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, महानगर पालिका आयुक्त दिपक पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. शंकरराव देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी आढावा बैठकीत कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरणाच्या प्रशिक्षणाबाबत सुक्ष्म नियोजन करा. कोव्हीड लसीकरण हे इतर लसीकरण कार्यक्रमापेक्षा पुर्णत: वेगळे आहे व पहिल्यांदाच ही लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यात कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उपविभागीय स्तरावर त्वरीत बैठका घेऊन शासनाच्या मार्गदर्शक सुचनांबाबत ग्रामपातळीवरील यंत्रणांना अवगत करा. अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.

यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे म्हणाले, कोव्हीड लसीकरण कार्यक्रम मोठा आणि सर्वांसाठीच राहणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे कोटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. कोल्ड चेन व पुरवठा चेन बाबत योग्य नियोजन करून ठेवा. त्यामुळे यंत्रणांनी आतापासूनच सुक्ष्म नियोजन करून आपली तयारी ठेवावी लसीकरणाबाबत जनजागृती करण्याकरीता शाळा, महाविद्यालय यांना समाविष्ठ करून घेणे आवश्यक आहे. तसेच सर्वांना लसीकरणबाबतचे प्रशिक्षण देण्यात येईल. सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने कामकाज करुन लसीकरण मोहिम यशस्वी करावी अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद यांनी पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. यात लसीकरण सत्रासाठी जागा उपलब्ध करणे, लसीकरणासाठी ज्यांनी पोर्टलवर नावनोंदणी केली असेल त्यांनाच लसीकरण करण्यात येईल. लस 28 दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा दयावी लागेल. निवडणूकप्रमाणे ओळखपत्राची खात्रीकरुनच लस देण्यात येईल. लसीकरण केंद्रावर तात्काळ नाव नोंदणी करुन लस घेता येणार नाही. लसीकरण सत्राची वेळ, जागा याचा संदेश मोबाईलवर येईल, पहिल्या टप्यात शासकीय रुग्णालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच खाजगी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व हेल्थ वर्कर यांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व खाजगी वैद्यकीय संस्थानी आपल्या दवाखान्याची व सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. लसीकरीता स्टोअरेजबाबत उपलब्धता आदींचा माहिती देवून  त्यांनी लसीकरण सत्र नियोजन बाबत सुचना केल्या.

 या बैठकीस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच जिल्हास्तरी व तालुकास्तरीय सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: