Maharshtra Marathi News Nanded Marathi News

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार 23 डिसेंबर रोजी ऑनलाईन जाहीर होणार

नांदेड (जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ऑनलाईन बुधवार 23 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून निकालाची कार्यपद्धती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे राहिल.

राज्यात नऊ विभागीय मंडळामार्फत नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर बुधवार 23 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 1 वा. जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रामणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इयत्ता 10 वीसाठी http://verification.mh-ssc.ac.inव इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.inया संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी गुरुवार 24 डिसेंबर 2020 ते शनिवार 2 जानेवारी 2021 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार 24 डिसेंबर 2020 ते मंगळवार 12 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबीट कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीआय, नेटबँकिंग याद्वारे भरता येईल.

नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

सन 2021 मधील इयत्ता 10 व बारावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणारे व अन्य विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबर 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस सर्व विषय घेऊन प्रथमच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील. सन 2021 मधील परीक्षेसाठी फेब्रुवारी-मार्च 2020 अथवा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेंतर्गत आवेदनपत्र भरुन परीक्षेस प्रविष्ट होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: